थेंब टपोरे ओले ओले..
पाऊस आला वारा आला
मोर लागले नाचू,
थेंब टपोरे ओले ओले,
भरभर गारा वेचू!
मंडळी, हे गाणं आम्ही लहानपणी मोठ्या आवडीने म्हणायचो! तसं आजही अधुनमधुन म्हणतो, नाही असं नाही. परंतु गेल्या २-३ वर्षात आम्ही मुंबईकर हे गाणं म्हणताना अंमळ बिचकूनच असतो! ;)
'हलकट कोकणी' हा आमचा मुंबईचा वार्ताहार असे कळवतो की,
कालपासून मुंबईत वरूणराजाचे जोरदार आगमन झाले आहे. जोराच्या वार्यासह धुवाधार पाऊस मुंबईत सुरू आहे. कुर्ला, घाटकोपर, दादरचा हिंदमाता सिनेमा विभाग, दादर टी टी येथे कमरेइतके पाणी साचले आहे व लोकांची अत्यंत गैरसोय होत आहे. काही ठिकाणी कार आणि टॅक्स्या पाण्यात संपूर्ण बुडू पाहात आहेत!
कितीही पाऊस आला तरी शासन व्यवस्था पाणी साचण्याच्या प्रश्नाशी मुकाबला करायला पूर्णपणे सक्षम आहे ही शासनाची गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेली गर्जना पहिल्या पावसानेच पोकळ ठरवली आहे.
जागोजागी पडलेले प्रचंड कचर्याचे ढीग, कचर्यामुळे तुंबलेली ड्रेनेजसिस्टिम, व नालेसफाईची कामे 'कालपर्यंत(!) खरं तर सुरूच होती पण अचानक (!) आलेल्या पावसामुळे गैरसोय होत आहे, नागरिकांनी कृपया सहकार्य करावे' अशी नवीन अधिसूचना आता शासन केव्हा जारी करते याची आता मुंबईकर आतुरतेने वाट पाहात आहेत असेही आमचा वार्ताहार कळवतो! ;)
असो! तरीही मुंबई माझी लाडकी! ;)
आपला,
(पावसाळ्यातला मुंबईकर!) तात्या.
Comments
शासनाची ऐशीतैशी..
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार आता चेंबूर, खार, मिलनसबवे या भागातही पाणी भरले असून मध्य, पश्चिम, व हार्बर रेल्वेच्या गाड्या अत्यंत धीम्या वेगाने सुरू आहेत. नव्या मुंबईतही काही ठिकाणी पाणी भरले असून काही ठिकाणचा विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे असे आमचा वार्ताहार कळवतो.
शासनाच्या डिझास्टर मॅनेजमेन्टच्या गप्पा यावर्षीही खूप ऐकल्या. वास्तविक 'सामान्य मुंबईकर' हा स्वतःच एक उत्तम 'डिझास्टर मॅनेजमेन्ट' आहे हेच खरे! २६ जुलै २००५ चा महाप्रलयात त्याने हे दाखवून दिले आहे!
आपला,
(अभिमानी मुंबईकर!) तात्या.
भिजून चिंब
होऊनही काल संध्याकाळी पार्ल्याला दिनानाथ मध्ये तुफान गर्दी होती. निमित्त होते 'माझे जीवनगाणे' या मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचन आणि गाण्यांच्या कार्यक्रमाचे. स्वत: मंगेश पाडगावकर आले होते. भाऊ मराठे यांनी त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. पाडगावकरांनीही मस्त विनोदी शैलीत उत्तरे दिली. कविता कशा सुचल्या, कवी म्हणून प्रवास कसा चालू झाला याविषयी त्यांनी सांगितलेच. शिवाय काही गाण्यांची /कवितांची कहाणी ही सांगितली.
' तुझे गीत गाण्यासाठी ' पासून कार्यक्रमाची सुरवात झाली मग " श्रावणात घननीळा" , "नीज नंदलाला", "शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी", "जेव्हा तुझ्या बटांनी" यासारखी सुंदर गाणी सादर झाली. शिवाय पाडगावकरांनी स्वत: त्यांची गाजलेली 'सलाम' ही कविता उत्स्फुर्त म्हणून दाखवली. बोलगाणी मधल्या कविता, वात्रटिका सादर केल्या.
त्यानी "श्रावणात" या कवितेचा जन्म तसेच श्रिनिवास खळ्यांनी "श्रावणात घननीळा बरसला" या गाण्याला भर मे महिन्यात कोळीवाडा ते व्हिटी प्रवास करताना कशी चाल लावली, त्याचा रंजक किस्सा सांगितला. काही विषयावर त्यांची स्वत:ची वाक्ये अशी-
"माणसाला खळखळून हसता आलं पाहिजे, स्वत:ला स्वत:शीच गाता आलं पाहिजे"
"अध्यात्म माणसाला जगण्याचा खरा आनंद उपभोगू देत नाही , अध्यात्म म्हणजे आपल्या देशाला झालेलं स्पिरिच्युअल कॉन्स्टीपेशन !"
"बायकोच्या किंवा आईच्या हातची आमटी. चांगली झाली की भुरके मारून पिताना होणारा आवाज मला ओंकाराइतकाच प्रिय आहे !"
" या जन्मावर " स्वत: पाडगावकरांच्या तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. "शुक्रतारा मंदवारा" ने कार्यक्रमाची सांगता झाली.
भर पावसात एका सुंदर कार्यक्रमाचा आनंद लुटता आला, मस्त आठवण कायमची लक्षात राहील. खरं म्हणजे पाऊस नुसता येत आणि जात नाही, मनात आठवणी ठेऊन जातो. कितीही दिवस झाले तरी पावसामुळे ती प्रत्येक आठवण मनात सदा टवटवीत राहते.
स्वत: पाडगावकर आणि त्यांच्या कविता पावसासारख्याच उत्साही आणि आल्हाददायक आहेत.
जाता जाता ...
काल आलेल्या पावसाला धन्यवाद !!
अरे कालिदासाच्या मेघदुता,
"अध्यात्म माणसाला जगण्याचा खरा आनंद उपभोगू देत नाही , अध्यात्म म्हणजे आपल्या देशाला झालेलं स्पिरिच्युअल कॉन्स्टीपेशन !"
हा हा हा! सही..
आम्हाला काकाजींचं एक वाक्य आठवलं. काकाजी गीतेचं पुस्तक कपाळाला लावत म्हणतात, "अरे शाम, फार थोर पुस्तक आहे हे बेटा. पण आपण नाहीना एवढे थोर! आपली पट्टी काळी दोन! काळी चार, काळी पाच मध्ये गायचं कसं!" ;)
"बायकोच्या किंवा आईच्या हातची आमटी. चांगली झाली की भुरके मारून पिताना होणारा आवाज मला ओंकाराइतकाच प्रिय आहे !"
खल्लास! अगदी खरं आहे! आईने वाढलेला गरमगरम आमटीभात, आणि 'अ'कार चरण युगुल, 'उ'कार उदर विशाल. 'म'कार महामंडल मस्तका..' असं वर्णन असलेला ॐकार या दोहोंची महती सारखीच! यात लहानमोठं ठरवायचं कुणी?!
वा मेघदूता, बर्याच दिवसांनी भरभरून आणि मनापासून प्रतिसाद द्यावा असं काही वाचायला मिळालं!
खरं म्हणजे पाऊस नुसता येत आणि जात नाही, मनात आठवणी ठेऊन जातो. कितीही दिवस झाले तरी पावसामुळे ती प्रत्येक आठवण मनात सदा टवटवीत राहते.
क्या बात है..!
अरे कालिदासाच्या मेघदुता, कार्यक्रमाचा वृत्तांत फार छान लिहिला आहेस हो! पाडगावकरशेठचा कार्यक्रम अगदी झकासपैकी एन्जॉय केलेला दिसतो आहेस! क्या बात है! जियो..
आता काय मेघदुता, तुझी तर मज्जाच आहे बुवा! 'आषाढस्य प्रथम दिवसे.. ' आता फार लांब नाही! त्यामुळे सध्या तू एकदम फॉर्मात आलेला दिसतो आहेस! ;)
तुझाच,
महाकवी तात्या!
पाडगांवकर..
मेघदूत,
आपला पाडगांवकरांच्या कवितांच्या कार्यक्रमाचा वृतांत आवडला.
आपण उल्लेखिलेली त्यांची काही वाक्ये.. ही त्यांची वाक्ये त्यांच्या अल्फा टीव्ही वरील नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातही त्यांच्या तोंडी आहेत.त्यांच्या जीवनगाण्याचे ते ध्रुवपद असावे! त्यांचे बोलणेही असेच रसरशीत असते,मी शाळेतअसताना एका बक्षिससमारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, त्याची आठवण झाली! या निमित्ताने पाडगांवकर,बापट,करंदीकर त्रयींचा काव्यवाचनाच्या अनेक वर्षांपूर्वी ,अनुभवलेल्या कार्यक्रमाची आठवण झाली.. आता बापट नाहीत! ते कार्यक्रमही नाहीत, आहेत त्या फक्त त्या मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी!
स्वाती
पाडगावकर आणि पावसाळ्यातील लिज्जत पापड..
मी शाळेतअसताना एका बक्षिससमारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते...
मला ही ती आठवण झाली...
तशीच पाडगावकरांची अजून एक आठवण होते ती म्हणजे त्यासुमारास लिज्जत पापडाच्या (महीला गृह उद्योग) साठी तयार केलेल्या जाहीरातींमधील त्यांच्या कविता. त्या कविता या ज्ञानेश्वरांच्या पद्धतीने "उ"कारान्त असायच्या. त्याच सुमारास आमच्या एका मित्राच्या पुढाकाराने गडकरी रंगायतनच्या खालील हॉल मधे एक नेटका पावसाच्या कवितांवर कार्यक्रम झाला होता. अरूण म्हात्रे तेंव्हा आले होते आणि त्यांनी पुलंनी केलेले पाडगावकारांच्या "लिज्जत" कवितेवरील मस्त विडंबन ऐकवले होते. ते बरेच दिवस शोधले, नंतर राहून गेले आणि नंतर अचानक "उरलसुरल" मधे मिळाले...
हो आठवलं! ;)
मी शाळेतअसताना एका बक्षिससमारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, त्याची आठवण झाली!
हो आत्ता आठवलं स्वाती! निबंधस्पर्धेत त्यांच्या हस्ते पहिलं बक्षिस मला आणि दुसरं बक्षिस तुला मिळालं होतं! ;)
आपला,
(शाळूसोबती) तात्या.
धन्यवाद
तात्या आणि स्वाती.
तिकडे पाऊस आला का !
एकदा मुंबईत पाऊस आला की,आम्हाला अभिजात पावसाची (काय करावे या अभिजाताला,)आठवण होते,आपल्या एका लयीत तो गात असतो,तेव्हा मला मुगाच्या भज्यांची मुद्दाम आठवण होते.तसा दोन दिवसापासून वेधशाळेचा अंदाज होता,मुसळधार पावसाचा,मी नक्की म्हटले,रिमझिम तरी पाऊस होईल म्हणून.मराठवाड्याचा हवामानाचा वृत्तांत इतकाच .
अवांतर;) मेघदूताचा वृत्तांत आवडला.पावसळ्यापूर्ते तरी ध्येय धोरणे शिथिल असती तर,पावसाच्या कविता (प्रख्यात कवींच्या हो)ऐकवल्या असत्या ;)
हवामान खातं!
(काय करावे या अभिजाताला,)
खरं आहे. अहो हल्ली 'अभिजात' शब्दावरून पब्लिक जाम पिडतं बघा! ;)
आपल्या एका लयीत तो गात असतो,तेव्हा मला मुगाच्या भज्यांची मुद्दाम आठवण होते.
वा! मुगाची भजी!! मार डाला...
मराठवाड्याचा हवामानाचा वृत्तांत इतकाच .
छे बुवा बिरुटेसाहेब! अहो तुमचा मराठवाडा अनेकदा कोरडाच जातो याचं मात्र वाईट वाटतं!
आणि बरं का साहेब, हवामान खातं हे जगातलं सर्वात विनोदी खातं असं आम्ही मानतो! ;)
पावसळ्यापूर्ते तरी ध्येय धोरणे शिथिल असती तर,पावसाच्या कविता (प्रख्यात कवींच्या हो)ऐकवल्या असत्या ;)
थांबा जरा! आतल्या गोटाशी बोलून पाहतो! ;)
बाय द वे, 'पावसाळ्यापुरते' हे आवडले! ;)
आपला,
(हवामनतज्ञ) तात्या.
पाऊस इथला तिथला
पाऊस आमच्याकडेही पडत होता गेले दोन दिवस, पण त्याला मुंबईच्या पावसाची सर नाही असे नेहमी वाटते. पाणी साचत नसेल तर पाऊस कसला?* आमच्याकडे ढग दाटून येतात, विजांचा कचकचाट, गडगडाट सुरू होतो. पाऊस १५-२० मि. धो धो कोसळतो आणि निघून जातो. पाणी साचत नाही, गाड्या बुडत नाहीत, ट्रेन नाहीतच बंद व्हायला, सुट्टी मिळत नाही. वाफाळलेल्या कॉफीचा मग हातात घेऊन गरमागरम कांदाभजी खायला काय मुहूर्त लागतो थोडाच पण अशा पावसाच्या दिवशी त्याची मजा अनोखीच असते.
मुंबईला असताना पाऊस कितीही पडत असेल तरी स्टेशनला जाऊन गाड्या चालू आहेत की नाही पाहणे, ट्रेनमधल्या मैत्रिणींबरोबर रेल्वेच्या कारभाराला येथेच्छ नावे ठेवणे, ट्रेनमध्ये बसल्यावर ट्रेन बंद पडली तर आता काय करायचे? उतरून किती चालावे लागेल? दुसरे पर्याय आहेत का? टॅक्सीवाला कितीपट जास्त भाडे लावेल? आजूबाजूला कोणाकडे सोय होण्यासारखी आहे का? घरी कसे कळवायचे? रामण्णा मेला कितीही पाऊस पडत असेल तरी ऑफिसला कसा पोहोचतो कोणास ठाऊक? अशा महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यातली मजा आगळीच असते.
घरात बसून पाऊस बघायचा असेल तर मजाच वेगळी. सुक्या बोंबलाचे भुजणं, वाफाळणारा पांढरा शुभ्र भात, फणसाची करंदी/ कोलंबी घालून केलेली भाजी, खिडकीतून दिसणारा टपाटप पडणारा पाऊस, लोकांची त्रेधातिरपीट, त्या निमित्ताने थंडावलेली मुंबई. बॅकग्राऊंडला हेमंतकुमार किंवा गीता दत्तचा सुरेल आवाज किंवा 'ओ सजना! बरखा बहार आयी' अशी खास पावसाची गाणी.... म्यॅन! आय मिस इट!!
* लोक आणि मालमत्ता यांचे नुकसान होईपर्यंत पाणी साचावे असे विचार मनात नाहीत.
बोंबिल..
सुक्या बोंबलाचे भुजणं, वाफाळणारा पांढरा शुभ्र भात, फणसाची करंदी/ कोलंबी घालून केलेली भाजी,
तू नुसती बोल! कधी आपुलकीने घरी जेवायला नको बोलावूस! ;)
आपला,
(बोंबोलप्रेमी!) तात्या.
एकदम मनातलं
एकदम मनातलं लिहीलं आहे! मुंबईचा पाऊस तो मुंबईचा पाऊस! बाहेर पाऊस पडत असताना घरात गरम गरम चहा पीत (आणि खात) बाहेर पडणार्या धारांकडे बघत गप्पा मारण्याची गंमतच निराळी..
चित्रा
आठवण
पावसाची, कोल्बिइची, फणसाची ज्याची आठवण् काढायची त्याची काढा. पण् घरात् बसून्. बाहेर् गेलेली माणसे पुरात् वाहून् गेली अशी बातमी कुठे वाचायला मिळालि कि २००५ जुलै चा पाऊस् आठवतो
खरंय!
तो प्रतिसाद मूळ प्रतिसादात ऍड करत असताना तात्यांचा उपप्रतिसाद आला. तेव्हा येथे लिहिते.
२६ जुलैची आठवण प्रत्यक्ष अनुभवल्याने अजूनही थरकाप उडतो पण हताश झाला - गेले दिवस आठवून गळून बसला तो मुंबईकर नाही. मुंबई पुन्हा उभी राहते होती तशी, आहे तशी नव्या वादळांचा सामना करायला. :)
२६ जुलै
पावसाची मजा लुटता येऊ नये अशीच व्यवस्था झालेली आहे, हे मान्य. असो. यावर नंतर कधीतरी वेळ काढून सविस्तर लिहीन.
चित्रा
२६ जुलैची आम्ही अनुभवलेली आणि कायमची स्मरणात राहिलेली मुंबई!
प्रलय
या चित्रातून प्रलयाची भावना निर्माण होते.
प्रकाश घाटपांडे
हरकत नाही!
अहो, तिकडे कृत्रिम सूर्य टांगण्याची चर्चा होतेय, मग इथे पूर्ण मुंबईला झाकणारी छत्री बनवायला काय हरकत आहे ?
काहीच हरकत नाही! विज्ञानाने अशी भली मोठी छत्री जरूर तयार करावी की जी पाऊस पडू लागला की कुठुनतरी आपोआप उघडेल आणि थांबला की आपोआप मिटेल! ;)
आपला,
(छत्र्या दुरुस्त करणारा!) तात्या.
अहो विद्वान...
श्री श्री तात्यासाहेब आणि युयुत्सु महाराज -
हा सूर्य आणि हे ढग हे त्या "महान" शक्तीने कृत्रिमपणेच आम्हा भक्तांसाठी टांगून ठेवले आहेत. "त्या"ची का तुम्ही "पामरे" बरोबरी करणार?
(कालातीत) एकलव्य
पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीची कल्पना..
ही कल्पना (हा विनोद) माझी(झा) नाही पण आवडलेला आहे. माझ्या एका मित्राचे डोके:
मुंबईवर छप्पर घालून त्याची पन्हाळी तानसा-वैतरणामधे सोडायची. पाणी तुंबणार पण नाही आणि पिण्याचा प्रश्न पण सुटेल्...!
इथे चार महिने सूर्य दिसतच नाही.
पाऊस!
पाऊस तसा आवडताच आहे माझ पण. पण काही खास आठवणी. त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगीरीच्या पर्वतावर कोसळणारा पाऊस हा काही वेगळाच असतो. जवळपास चे लोक इथे वरती चहा च्या वगैरे सोई करतात. कधी कधी भजी पण!
इथे चार महिने सूर्य दिसतच नाही. फक्त पाऊस नि पाऊस. कधी जोरदार तर कधी धीमा.
ठाणे जिल्ह्याच्या काही भागा पासून ते नाशिक च्या काही भागा पर्यंत पसरलेला सह्याद्रीचा हा भाग. म्हणजे भंडारदरा पासून घोटी, वैतरणा, (शहापूर पण?) त्र्यंबक, ते जव्हार, मोखाडा वगैरे. पर्वताळ नि वनराजीर्यापैकी असलेला प्रदेश.
भात या काळात इथे जोरात होतो. इथले लोक अगदी गरीब आदिवासी. पावसाळ्यात जो काही भात होईल तेच वर्षभराची उत्पादन. त्यवरच कपडे, पोरांच्या शाळा, लग्न असं सगळं अवलंबून. पावसाळ्यात असं पाणी की कोरडं काहे सापडायचं नाही. पण उन्हाळ्यात असे हाल की विचारू नका.
इथे वनखात्याचं काम बरंच आहे. (त्यामुळे वाद, भ्रष्टाचार, आणी आदिवासींची पि़ळवणूकपण खुप आहे!) आदिवासी संघटनाही कार्यरत आहे.
पाऊस अति असल्याने गैरसोई पण फार. याचा विचार करुन मागे काही वर्षांपुर्वी 'पहाणे' नावाच्या गावात सरकारने प्रत्येक घरटी संडास बांधून दिले. आता पहा, पाण्याची, निचर्याची काहीच सोय नाही पण एक चकाचक संडास! बोला! आहे की नाही मस्त प्रगती! असे ही ते संडास काही कोणी वापरायला नाही. सगळे गाव 'जाणार' डोंगरावर! असो, याचा उपयोग मुख्य पावसा़ळ्यात गोष्टी कोरड्या ठेवायला होतो. ती मात्र एक मोठीच सोय झाली आहे.
अशा या भागात श्रावणात त्रंबकच्या फेरी साठी खुप लोक येतात. एका रात्रीत ब्रह्मगीरीला (हे महाराष्ट्रातले दुसर्या क्रंमांकाचे उंच शिखर आहे.) एक फेरी घालून (पाय सुजवून) घरी! हे शिखर पावसाळ्यात पुर्ण ढगातच असते. शिवाय वार्याच्या झोताने इथले बरेच धबधबे वरून खाली पडण्याऐवजी चक्क वर आकाशात जातात! मस्त धुकेरी पर्वताची टोकं, कोसळता पाऊस, आपल्यालाही आता कोरडं वाचवता येण्यासारखं काहीच नाही ही जाणीव, त्यामुळे आपलं ही पुर्णपणे पावसाच्या शरणागत होणं... हे सगळ पाहून अगदी हरखूनच जायला होतं. एका वेगळ्याच जगात आपण पोहोचतो.
मात्र जाता जाता सकाळी फेरी संपवून त्र्यंबकेश्वराची तिखट जाळ मिस्सळ खायला हवीच!
जातांना मंदिराच्या दारा जवळच काही हॉटेल्स(?) आहेत. तेथे मिसळ! बाहेर पाऊस दे दणादण कोसळतोय... एखादा एकटाच बहाद्दर या पावसात पळत् जातोय. बाकी जग गसं थांबलंच आहे. पावसा शिवाय एकच गोष्ट चालू - पायात ठणठण! आणी समोर वाफाळती मिसळ आणी मिसळ झाल्यावर गोड घट्ट असा मस्त चहा! वा!
असो, आडव्या-तिडव्या पावसा सारखंच काहीच्या बाहीच लिहिलं गेलंय!
-निनाद
मिस्सळ!
मिस्सळ! अहाहा! पावसाळ्यात तिखट तिखट मिस्सळ...!
अगदी पाणीच सुटलंय तोंडाला...
बाहेर जोरदार पाऊस!आअपण छोट्याश्या हॉटेल मध्ये.
समोर गरमगरम मिस्सळ, त्यावर कांदा, कोथींबीर, शेव!
सोबत अगदी ताजे पाव - त्यांच तो भाजलेला भट्टीच खमंग वास!
जोडीला रेडियोवर ऐकु येणारे, महमद रफीच्या आवाजातले 'मधुबन मे राधीका नाचे रे'
अहाहा!
स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असला पहिजे हो!
आपला
(अनेकदा स्वर्गीय झालेला!)
गुंडोपंत
आनंदाश्रू!
बाहेर जोरदार पाऊस!आअपण छोट्याश्या हॉटेल मध्ये.
समोर गरमगरम मिस्सळ, त्यावर कांदा, कोथींबीर, शेव!
सोबत अगदी ताजे पाव - त्यांच तो भाजलेला भट्टीच खमंग वास!
वा गुंड्या! डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले रे!