इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २)
पहिल्या भागात दिलेल्या भरभरुन प्रतिसादांसाठी, सुचवलेल्या दुरुस्त्यांसाठी सर्व वाचकांचे आभार.
पहिला भाग.:- http://mr.upakram.org/node/3196.
मालिकेच्या नावातही ह्या भागापासुन दुरुस्ती करतोय.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग २) जेणेकरुन शीर्षकावरुन मुख्य उद्देश जाहिर होइल. इथे संस्कृतींचा काळ दिलेला नाही. तो संपूर्ण इसवीसन पूर्व काळातला(इ स पूर्व २० ते २५ शतके इतकाही जुना) आहे. मुख्य उद्देश ह्या संस्कृती बायबलमधील घटनांत,कथांत डोकावत राहतील, त्यासाठी फक्त त्यांचं भौगोलिक माहात्म्य व कौशल्य सांगणे हा आहे.
३. संस्कृती होती म्हणताय, मग कुठकुठल्या होत्या बरं ह्या संस्कृती?
३. १प्राचीन इजिप्शियनः- बऱ्याचदा आपण अतिभव्य, अफाट अमानवीय वाटणाऱ्या पिरॅमिडबद्दल, तिथल्या स्फिंक्स बद्दल वाचतो, बघतो. आजच्या इतकं तंत्रज्ञान प्रगत नसतानाही शेकडो टन वजनाची एक शिळा, अशा शेकडो हजारो शिळांपासून अफाट बांधकाम करणारे प्राचीन लोक म्हणजे प्राचीन इजिप्शियन. नाइल नदीच्या काठावर ह्यांची वस्ती. काठावर हिरवीगार शेतं आणि काठापासून थोडसचं दूर लगेच अफाट, लांबच लांब वाळवंट, अशी वैशिष्ट्य पूर्ण नैसर्गिक पार्श्वभूमी लाभलेला हा भूभाग. ह्याचा बहुतांश भाग उत्तर आफ्रिकेत आणि थोडासा भाग आशियात येतो. (आशिया-आफ्रिका ह्यांच्या सीमेवर हा आहे. ) हे लोक मूर्तिपूजक. अगदी प्राचीन संस्कृतीपैकी एक. नागर, कृषी संस्कृती. सोन्याचा बराच वापर केलेला दिसतो. सोन्याचा देवही बनवत. बळी देण्याचीही प्रथा होती. सर्वात जुना लिखित इतिहास हा इजिप्तचाच आहे. हे लोक स्वतःला "हेत कोपता" असं काहिसं म्हणवून घ्यायचे. त्याचाच ग्रीक अपभ्रंश "हेगिप्तस" आणि त्याचाच पुढे "इजिप्त " बनला. ह्यांचे शासक फेरो/सम्राट स्वतःला देवाचा अवतार कीम्वा देवच मानायचे.
इब्राहिमी धर्मातले प्रमुख पंथ मात्र "कुठलाही मनुष्य स्वतः देव किंवा देवाचा अवतार असूच शकत नाही, परमेश्वर हा सर्व सृष्टीचा मालक/पालक असला तरी ह्यापैकी कुठल्याच एका घटकात बंदिस्त नाही" असं मानतात. त्यामुळं साहजिकच हे फेरो खलनायक किंवा वाईट प्रवृत्तींचे प्रतीक म्हणून त्यांच्या ग्रंथात दाखवलेत. खोदकाम, बांधकाम, कृषी ह्यातलं प्रावीण्य आणि भक्कम, स्थिर समाजरचना म्हणजे तत्कालीन इजिप्त. ह्यांनी आदिम काळातच नकाशा, फिनिशियनांकडून कल्पना उचलून अॅबॅकसमध्ये सुधारणा केल्या होत्या. गणन यंत्रणेतही हे काळाच्या फारच पुढे होते. हे वंशानं आफ्रिकन नसावेत. आशियायी असावेत.
ह्यांचे तीन प्रमुख देव. त्यांची आपसात नाती होती :- नवरा बायको आणि पुत्र. शरद उपाध्ये ह्यांनी एका लेखात ही कल्पना शिव-पार्वती आणि श्री गणेश ह्याच्या अगदी जवळ जाणारे आहे असं म्हटलय.
३. २ हिटाईटस /हित्ती :- तुर्कस्थानच्या भूमध्य समुद्राच्या(Mediterranean) काठावर हा मानव समूह होता.
वेगवान रथ बनवण्यात ह्यांचा हातखंडा होता. ब्राँझ ताम्र पाषाण काळातून बाहेर येऊन लोखंडाचा वापर करण्याऱ्या प्रथम समूहांपैकी एक. वेगवान रथ वापरून ह्यांनी तत्कालीन प्रगत इजिप्शियन सम्राट रॅम्सिस (का रामसेस? ) ह्याच्याही नाकी नऊ आणले होते. तोवर, इजिप्शियनांना उघड युद्धात इतकं प्रखर उत्तर कुणीच दिलं नव्हत. इतर बहुतांश समूह तेव्हा संघटित आणि civilized झाले नसावेत. ज्यूंच्या इतिहासात ह्यांचा उल्लेख आहे. मात्र ख्रिश्चन आणि इस्लामच्या इतिहासात तितकासा नाही. कालौघात हे नष्ट झालेत किंवा इतर समाजात मिसळून, विरघळून गेलेत म्हणण्यास वाव आहे.
ह्यांच्या अनेकविध देवता होत्या. ह्या देवताही एकमेकांच्या नातेवाईक होत्या. मूर्तीपूजक.
३. ३ फिनिशियन "३०० " नावाचा दे- दणादण हॉलीवूडपट पाहिलात? त्यात इराणचा राजा झर्क्सिस ग्रीसवर (अथेन्स व स्पार्टावर) जहाजांचा अफाट ताफा घेऊन, समुद्र ओलांडून हल्ला करतो असं काहीसं दाखवलंय.
अशी जहाजं बनवण्यात तेव्हा पर्शियन राज्य प्रगत नव्हतं. त्यांनी ती विद्या शिकली, जहाजं बनवून घेतली फिनिशियनांकडून.
फिनिशियन हे उत्तम खलाशी होते. लेबनॉन, सिरिया आणि इसराइल हे देश भूमध्य समुद्राच्या काठावर एका पट्टीत, एका ओळीने आहेत. ह्या तीनही देशांच्या किनारपट्टीवर विरळ लोकसंख्येने राहणारे लोक फिनिशियन. दूर दूर पर्यंत समुद्री प्रवास, समुद्र ओलांडून प्रवास करणारे हे पहिलेच. (त्यापूर्वी, समुद्री किनाऱ्यावरील कोळी समुद्रात जाऊन समुद्री जीव घेऊन परत येत. समुद्र ओलांडून जाण्याची आणि मग तिथून परत येण्याची नेहमीची सवय फिनिशियनांचीच. ) ह्यांनी आपल्या स्थानावरून निघून ग्रीसपर्यंत प्रवास केला. तिथून पुन्हा ते तुर्कांकडेही जाऊ शकत. ह्यांनीच पुढे जाऊन कार्थेज वसवल असा एक अंदाज आहे. हो. तेच कार्थेज ज्यांनी पुढील काळात महाबलाढ्य अशा रोमन साम्राज्याशी हन्निबल ह्याच्या नेतृत्वात दोन हात केले. इतका मोठा दणका रोमनांना तेव्हा आख्ख्या युरोपात किंवा मध्यपूर्वेत कुणीच दिला नसेल.
इ स पूर्वे १००० काळात चित्रलिपी सोडून स्वतंत्र अक्षर चिन्हे Byblos इथे बनवणारे हे पहिलेच लोक असावेत.
इथूनच ग्रीक biblia शब्द बनला असावा. ह्यांची छाप Aramaic व Greek मुळाक्षरांवर पडली.
हे सुद्धा बहुदेवता वादी. याव्हे-मोलोक हे पती पत्नी ह्यांच्या देवता.
३. ४मेसापोटेमियन : - आजच्या इराक मधील तैग्रिस आणि युफ्रेटिस ह्या नद्यांमधला सुपीक दुआब म्हणजेच मेसापोटेमिया.
इथेच पुढे अब्राहमाचा जन्म झाला. ते नंतर. नगर रचना शास्त्र, ज्योतिष गणित, चांद्र पंचांग ह्याच्यात हे खूप पुढे होते. १२ महिने असलेले क्यालेंडार, २४ तासाचा दिवस, ह्यांच्याकडे त्याही काळात वापरात होतं. नांगर सुधारणा, कुंभारकाम, कालव्यांचे जाळे खणणे ह्यात त्यांनी बरीच प्रगती केली. मेसापोटेमिया ह्या भागात आधी असीरियन मग सुमेरियन आणि शेवटी बाबिलोनिअन लोकांनी राज्य केलं. वेळोवेळी अब्राहमाच्या देवाचा प्रकोप ह्यांना अनैतिकते मुळे झेलावा लागला असं बायबलच्या जुन्या करारात दिलय.
३. ५ इतिहास प्रसिद्ध पर्शियन/इराणी साम्राज्य :- "३००" हा दे-मार पट हॉलीवूड शिनेमा पाहिलात ना? त्यातली व्हिलनची बाजू म्हणजे सम्राट झर्क्सिसची बाजू म्हणजे पर्शियन साम्राज्य.
ह्याचा नुसता बायोडेटा देणं म्हणजे लिहिणाऱ्यानं हात दुखवून घेणं आणि वाचणाऱ्यानं थकून जाण्याइतकं आहे. इस पूर्वे पंधराएक शतकांपासून मध्य पूर्वेतीलच नव्हे तर जगातील एक महत्वाची, अवाढव्य लष्करी शक्ती, सुस्थित संस्कृती म्हणजे पर्शिया. हे लोक अग्निपूजक. झरतुष्ट्र ह्या प्रेषितानं त्या तत्त्वज्ञानाची अधिक मजबूत बांधणी केली. ह्यांचा विस्तार सांगतो:-
हे ग्रीसशी लढायचे म्हणजे भूमध्य समुद्र उतरून लढायला जायचे म्हणजे तितका भूभाग ह्यांच्या ताब्यात होता. आ़जचा इराक, इराण, पूर्व-दक्षिण तुर्कस्थान हा तर राज्याच मुख भाग होता. पूर्वेला ऐन भरात राज्य असताना(at its Zenith) आख्खा अफगाणिस्तान आणि भारताच्या सिंध-बलुच प्रांतातील बराचसा भाग ह्यांच्या ताब्यात होता. शिवाय मध्य आशियात
तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान (U S S R मधील) ह्यांचा दक्षिण पट्टा हातात. क्षत्रप नेमण्याची पद्धत ह्यांच्या कडून ग्रीकांनी आणि ग्रीकांकडून आख्ख्या जगाने उचलली म्हणतात. पर्शियनांना (राजा दारियस) हरवल्यावरच आपण खरोखर शक्तिशाली आहोत, जग जिंकू शकतो असं सम्राट सि़कंदराला वाटायला लागलं. जागतिक व्यापारातला हे एक महत्वाचं केंद्र होतं. ह्यांच्या बऱ्याचशा कल्पना प्राचीन वेदकल्पनांशी खूपच साधर्म्य दाखवतात.
हे सगळं मी का सांगितलं? कारण ह्या सर्व संस्कृतींचा उल्लेख ज्यू-ख्रिश्चन-इस्लामिक साहित्यात पुन्हा पुन्हा येत राहील.
कधी शत्रू म्हणून, कधी आश्रयदाते म्हणून तर कधी अनुयायी आणि दोस्त म्हणून. त्यावेळेस ही नावं ओळखीची असली, तर मस्त गोष्टी वाचल्याचा फील येईल.
४. ह्यांचा (इब्राहिमी) धर्मग्रंथ कुठला?
:-ज्यूंचा बायबल. बायबला जुना करार.
ख्रिश्चन बायबल चा जुना करार, नवा करार दोन्हीला मानतात.
बायबल हे गीतेसारखं एकटाकी, एकाच व्यक्तीनं लिहिलेलं किंवा सांगितलेलं पुस्तक नाही. ते अनेकानेक भविष्यवेत्त्यांनी, प्रेषितांनी आणि द्रष्ट्यांनी लिहिलंय. जुन्या करारात विश्वोत्पत्ती(जेनेसिस, अॅडम-ईव्ह कथा) आहे, मोझेसचा पराक्रम आणि वेळोवेळी भटकलेल्या ज्यू समाजाला इश्वरमार्गावर आणण्यासाठी परमेश्वरानं योजलेल्या घटना, उपदेश आहेत.
नवा करार म्हणजे येशूच्या चार अनुयायांनी येशूच्या चमत्काराचं आणि शिकवणुकीचं केलेलं वर्णन.
कुर-आन :- देवदूत जिब्राइल (गॅब्रियल ) ह्यानं इश्वर साक्षात्काराच्या दरम्यान प्रेषित महंमदाला उपदेश केला.
महंमदांनी प्रवचनातून आपल्या एकनिष्ठ आणि अगदी सुरुवातीच्या अनुयायांना (हे अनुयायी म्हणजे " साहाब" ज्यांनी महंमदाच्या हस्ते इस्लामची शिकवणी घेतली आणि शिष्यत्व पत्करलं. तुम्ही बघाल पुढे महंमदानंतर ज्या ज्या लढायात साहाबा लढले, तिथे सर्वत्र त्यांचा विजय झाला. ) हे सांगितलं. हे उपदेश महंमदानंतर काही वर्षातच ग्रंथीभूत करण्यात आले, ते म्हणजे कुर-आन. तोवर ते मौखिक परंपरेनं चालत होते.
हादिस/हादिथः- प्रेषित महंमद ह्यांच्या जीवनातील घटना/गोष्टी ह्यांचा संग्रह.
इस्लाममधील वेगवेगळे पंथातील हदिसमधलं प्रमुख घटनांचं वर्णन एकच असलं तरी काही पंथांच्या काही गोष्टी वेगवेगळे संदेश देतात. शिया आणि सुन्नी ह्यांच्या स्वतःच्या हदिसमधील बहुतांश घटना एक सारख्या आहेत, काही थोड्या मात्र वेगळ्या आहेत. ज्या गोष्टीबद्दल कुराणात स्पष्ट उल्लेख नाही, त्याबद्दल हदीसला शरियत कायद्यात प्रमाण मानण्यात येतं.
५. यांच्या देव-देवता, जीवन-मरण आणि नैतिकता ह्याबद्दल संकल्पना कुठल्या?
बस्स. येव्हढं एक माफ करा. हे पुढच्या भागात टंकतो. आता त्राण उरले नाहित.
आपलाच
मनोबा.
Comments
वाचते आहे
लेख थोडा विस्कळीत वाटतो. मला जे म्हणायचे आहे ते सहस्रबुद्ध्यांनी खाली मांडले आहे.
मला वाटते भूमध्य सागरासोबत एजीयन समुद्राचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे. संस्कृती या समुद्राच्या सभोवताली फोफावल्या आणि या समुद्राखाली पायथ्याशी जो देश होता त्याला एजीयन समुद्रामुळे इजिप्त असे नाव पडले असे म्हटले जाते पण अधिक व्युत्पत्ती असण्याची शक्यता आहेच.
यातील पहिल्या वाक्याचा दुसर्याशी संबंध लागत नाही यालाच विस्कळीतपाणा म्हणते. तीन प्रमुख देव कोणते ते येथे यायला हवे. आपापसात नाती कोणाची होती? देवांचीना? जोडीदार आणि मुलाचे नाते असणारच पण त्यात वेगळेपणा कोणता ते दिसायला हवे. तसे दर्शवायचे नसेल तर संपूर्ण वाक्याची गरज नाही. इजिप्शियन मूर्तीपूजक होते आणि अनेक देवांना किंवा त्यांच्या प्रतिमांना पूजत होते एवढे पुरेसे होईल.
फोनेशियन नौकाशास्त्रात प्रवीण होते हे योग्य आहे परंतु सायरसने त्यांना अंकित केल्यावर त्यांचा विनाश होत गेला तेव्हा फोनेशियनांची सुरुवात डायरेक्ट ३०० या हॉलिवूडपटापासून सुरू होणे खटकते पण बाकी माहिती बरीचशी योग्य आहे.
वरील गोष्टी लिहिण्याचा उद्देश विस्कळीतपणा येऊ नये इतकाच आहे.
ज्यांनी ३०० हा चित्रपट पाहिला नाही त्यांना वेडात वीर दौडले... तीनशे सात हा लेख वाचून थोडीफार माहिती मिळवता येईल.
इजिप्शियन देव व शंकर
सेरापिज या इजिप्शियन देवावरून शंकराची कल्पना उचलली गेली असा एक विचार प्रवाह आहे. हा देव मुळात इजिप्तमधे स्थायिक झालेल्या ग्रीक लोकांनी निर्माण केला. ही मंडळी चित्पावनांचे पूर्वज असल्याचा दावा करण्यात येतो. यांनी हा देव भारतात आणला व कालांतराने शंकराला हे रूप प्राप्त झाले अशी एक थिअरी आहे.

लेख आवडला. आता लेखाला जरा स्वरूप येऊ लागले आहे. पर्शिया बद्दलचा उल्लेख फार विस्कळित आहे. पर्शियातील राजा Xerex याच्या नावाचा योग्य उच्चार खशायरशा असे आहे.
उपक्रम च्या दिवाळी अंकातल्या माझ्या लेखाचा हा दुवा ज्यांना रस असेल ते बघू शकतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
कहीही
काहीही थियर्या मांडतात लोक! उचलली जीभ लावली टाळ्याला. दुर्दैवी!
लेख विशय काय प्रतिसाद काय?
चित्पावनांना प्रमुख समाजापासून वेगळे पाडण्याचे उद्योग अजून किती काळ चालतील?
शिवाय या भूमीत मुळचे काही नाहीच. सगळे बाहेरून आले - हे सारखे सारखे पटवून द्यायचे.
-शिवा
?
>>चित्पावनांना प्रमुख समाजापासून वेगळे पाडण्याचे उद्योग अजून किती काळ चालतील?
चित्पावनांना वेगळे पाडण्याचे उद्योग इतरांनी करण्यापेक्षा चित्पावन स्वतःच असे (स्वतःचे वेगळेपण दाखवायचे) उद्योग करत असतात हे लक्षात घेतलेले बरे.
नितिन थत्ते
चित्पावन
चित्पावनांना कोणी वेगळे पाडित् नाही, पण चित्पावन स्वत्: ही थिअरी उचलून धरतात.
अधिक उणे कोण जाणे.
पुळुमावी प्रमोदिनिपुत्त
त्रीसमुद्रपीततोय!
टोलेमी
यात तथ्य नसावे. सेरापिजची स्थापना टोलेमीने केली. टोलेमी असताना भारतात शिव, विष्णू हे देव जुने झाले होते. कृष्णाची पूजा वगैरे अलेक्झांडरच्या आधीच करणे सुरु झाले होते. ग्रीकांच्यामतेही डिऑनॉसिस हा शिवासारखा असावा असे म्हटल्याचे आढळते.
फॅशन
सहमत आहे.
वेदांमध्ये सगळंच आहे, आणि आम्ही(च) शहाणे होतो, आहोत, सगळ्या जगानेच आमच्यापासून अक्कल घेतली आणि शहाणे झाले - असं मानणारे; आणि
भारतात जे काही आहे, त्याचे इतरत्र कुठे साम्य आढळले, तर ते बाहेरून भारतात आले आहे, भारतातून बाहेर (नक्कीच) गेलेले नाही - असं मानणारे
यांच्यात मला काहीही फरक दिसत नाही.
चांगला प्रयत्न
प्रयत्न चांगला आहे. अनेक शुभेच्छा. लेख सैंद्धांतिक (आयडियॉलॉजिकल) न होता माहितीपूर्ण झाला आहे. कदाचित हेच त्याचे यश आहे.
थोडे विस्कळीत वाटते. पण ते सुधारण्यासारखे आहे. (पुढील संस्करणात)/ जसे प्राचीन इजिप्शियनात इब्राहिमी धर्म कल्पना.
धर्मकल्पनेमुळे लोकात तेढ होते भांडणे होतात हा तुमचा आवडता सिद्धांत असावा. हा लेखातील सैद्धांतिक भाग. इजिप्शियन लोकांचे आणि ज्यु लोकांचे निश्चित झगडे होते. पण त्यात धार्मिक कारण कमी असावे. त्याच बरोबर फक्त ज्यु आणि इजिप्शियन लोकांचे भांडण होते. त्याला इब्राहिमी असे सार्वत्रिकरण योग्य नाही.
देवाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यात आपला देव नावाची कल्पना असते. हा देव फक्त त्या कुलासाठी,गावासाठी वा जातीसाठी वा टोळीसाठी असतो. ज्युंचा जुन्या करारातला देव हा त्याप्रकारचा देव असावा.
हा अब्राहमचा देव हा त्यातलाच असावा असे त्याच्या कथेवरून वाटते. याउलट जगन्नियता देव अशी कल्पना असते. ख्रिश्चन-मुस्लिम धर्मात अशा जगन्नियता देवाची कल्पना दिसते. या तीन धर्मांची एकत्र मोट बांधत असल्याने त्याला विरोधाचे लिहितो. ख्रिश्चन ध्रर्मात मूर्तिपूजा थोडी फार आहे. ज्युंचे मला माहिती नाही. देव-देवाचे भूत आणि देवपुत्र अशी त्रिसूत्री (ट्रिनिटी) ख्रिश्चनात आहे. मुस्लिम धर्मात या दोन्हीचा विरोध आहे.
इतर माहितीत तपशीलाच्या चुका असू शकतील. पण या संस्कृतींचा तुम्ही तुमच्या विवेचनाशी कसा संबंध घालणार आहात हे बघायचे आहे.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
प्रमोद
हुश्श्....
शेवटी मिळाला बुवा प्रतिसाद्.
लेख सैंद्धांतिक (आयडियॉलॉजिकल) न होता माहितीपूर्ण झाला आहे.
हो. त्या धर्मांच्या तत्त्वज्ञानात खोल जाउ शकणार नाही. सध्या फक्त तिथल्या लोक कथा, कथा,श्रद्धा ह्यांच्याशीच निगडित ठेवायचा विचार आहे.
श्रद्धा कुठल्या? असं विचारलं की काही सिद्धांत् येतीलच; पण् ते फक्त bullet points म्हणुन. भारतीयांच्या चष्म्यातून बोलायचं झालं तर, महाभारतातल्या काही ठळक् गोष्टी किंवा घटना मी सांगणार आहे. महाभारताचा एक भाग म्हणुन कदाचित् भगवत् गीतेचा उल्लेख् येइल.पण् गीतेच्या तत्त्वज्ञानात किंवा आध्यात्मिक दृष्टीकोनात खोलवर उतरणं जमणार् नाही.
***************************************************************************
इजिप्शियन लोकांचे आणि ज्यु लोकांचे निश्चित झगडे होते. पण त्यात धार्मिक कारण कमी असावे. त्याच बरोबर फक्त ज्यु आणि इजिप्शियन लोकांचे भांडण होते. त्याला इब्राहिमी असे सार्वत्रिकरण योग्य नाही.
"आजचे जे इजिप्तचे नागरिक आहेत, तेही त्याच देशात्,त्याच मातीत होउन गेलेल्या फेरोला काही थोर् समजत नाहित.उलट एक वाइट सिम्बल,खलतेचं प्रतीक म्हणुनच बघतात."
हे मला जाणवलं त्याची तीन कारणं :--
१.मीना प्रभू ह्यांनी अनेक प्रवासवर्णनं लिहिलित्. त्यापैकी "इजिप्तायन" ह्या पुस्तकात त्यांनी इस्रेल,पॅलेस्टाइन्,इजिप्त आणि जॉर्डन ह्या देशांच्या प्रवासाबद्दल,अनुभवाबद्दल लिहिलय.
बर्याच ठिकाणी त्यांना पुरातन वास्तु विषयी अनास्था आढळली ,व फेरो व तत्कालिन समाज(इस्लामपूर्व, पिर्यामिडकालीन) हा अत्यंत पापी,अनाचारी,व्यभिचारी असल्याची भावना सध्याच्या इजिप्शियन जनमानसात दिसली. हे धार्मिक प्रभावामुळं असावं असा त्यांचा(ही) कयास् आहे.
२. लेटेस्ट जस्मिन क्रांतीत सत्ता गमावलेले इजिप्तचे शासक होस्नि मुबारक मुळात सत्तेवर कसे आले ठाउक आहे? त्यांच्या आधिचे लष्करी शासक अन्वर् सादात ह्यांची एका मूलतत्ववाद्यानं हत्या केल्यामुळं होस्नि , अन्वरचे तत्कालीन् सहकारी सत्तेत् आले.
अन्वर सादात ह्यांची हत्या केल्यावर मूलतत्ववादी युवक पुन्हपुन्हा काय म्हणत होता माहितिये? "मी फेरो चा खुन् केलाय्. मी फेरो ला संपवलय."
जणु काही त्यानं "क्रूर् फेरो"चा "वध" च केला होता! "खल"तेचं एक् निशाण मिटवलं होतं.
३. इब्राहिमी कथांमध्ये मला अजुन तरी फेरो चा गौरवपूर्ण उल्लेख आढळलेला नाही. (एक् दोन् ठिकाणी पारशी सत्तेबद्दल यहुद्यांचा सॉफ्ट कॉर्नर् दिसला तसा सुद्धा नाही.)
जिथं जिथं सापडला तिथं तिथं त्याला खलत्वाचं प्रतीक असाच दिसला. उदा जुन्या करारातला हा एक् उपदेश बघा:-
"मोझेस च्या समूहाला मारण्यासाठी इजिप्शियन सैन्य वेगानं चालुन जात असताना, प्रत्यक्ष परमेश्वरानं त्यांच्या मध्ये फायरवॉल/अग्निस्तंभ उभा केला. तो ढळढळित समोर् दिसत असतानाही त्याचं मस्तक ईश्वरापुढं झुकलं नाही. तस्मात् हे माझ्या पुत्रांनो, तुम्ही त्याच्यासारखे अश्रद्ध होउ नका, दुराचारी होउ नका."
काही फेरो दाढी पूर्ण् \/ आकारात वाढु द्यायचे, आणि मग् त्याला बरोब्बर् अर्ध्यावर कापुन \_/ असा आकार द्यायचे.
(खरे तर दाढी करुच नका असे ते इब्राहिमी म्हणतात, पण त्यातल्या त्यात करायचीच असेल तर् एक् वेळ् पूर्ण् सफाचट् दाढी खपवुन् घेतील कशीबशी, पण् \_/ असा आकार कधीही सहन केला जाणार् नाही. )
नेमकं हेच करणं आज ज्यू आणि मुस्लिमात् निषिद्ध आहे. एखाद्याला अति-अपमानित करण्यासाठी त्याची दाढी कापुन् त्याला "\_/ " असा आकार दिल्याचे उल्लेख आहेत्.
असे केल्यानं तो मनुश्य् अतिलज्जित् व क्रुद्ध होई.
**************************************************************************
देवाच्या वेगवेगळ्या कल्पना असतात. त्यात आपला देव नावाची कल्पना असते. हा देव फक्त त्या कुलासाठी,गावासाठी वा जातीसाठी वा टोळीसाठी असतो. ज्युंचा जुन्या करारातला देव हा त्याप्रकारचा देव असावा. हा अब्राहमचा देव हा त्यातलाच असावा असे त्याच्या कथेवरून वाटते. याउलट जगन्नियता देव अशी कल्पना असते. ख्रिश्चन-मुस्लिम धर्मात अशा जगन्नियता देवाची कल्पना दिसते.
बराचसा सहमत्. ह्याला देवाचं उन्नयन म्हणता येइल का? जाणकार भाष्य् करतील् का?
या तीन धर्मांची एकत्र मोट बांधत असल्याने त्याला विरोधाचे लिहितो.
एकत्र मोट लिहायचं कारण तिसरा पहिल्या दोघांचे आणि दुसरा पहिल्याचेच केवळ् जैविक् नव्हे तर आध्यात्मिक्,नैतिक वारस असल्याचे गर्वाने,अभिमानाने सांगतात.
एकमेकांची अवतरणे नामोल्लेखासह दाखले म्हणुन् देतात्. प्रेषित महंमदाच्याच काळात त्याच्या पासुन् फक्त् काही शे मैलांवर अलात् नावाच्या देवतेची मूर्तीपूजा होइ. त्यांचासाठी महंमद् भौगोलिक दृष्टीनं जवळ् असला , तरी त्यानं मूर्तीपूजेचा वारसा मिरवला नाही. आपण इब्राहिमी परंपरेचे पाइक् आहोत हे तो वारंवार सांगत राहिला. त्याच्या म्हणण्यानुसार, इस्लाम त्यानं स्वतः स्थापन् केलेला नाहे. तो जगाच्या आरंभापासुनच् आहे. इस्लामची खरी उद्घोषणा समस्त मानवांसाठी प्रथम केली ती अब्राहमानं. अब्राहमानचं प्रथम काबा,मक्का मदिना ह्या ठिकाणांना पवित्र पीठे स्थापन केली. महंमद हा तर अंतिम् प्रेषित आहे.(मग् आधिचे कोण्? ते बरेच् आहेत्, त्यापैकी प्रमुख् येशू, अब्राहम,डेविड्,सोलोमन आणि इस्माइल्).ह्यातले सर्व् (इस्माइल् वगळता) ज्यू आहेत.
एक स्वतः ख्रिश्चन् धर्माचा प्रेषित् आहे. त्यामुळं ह्या तीन् स्कूल् ऑफ् थॉट्स् साहजिकच एकमेकात गुंतलेल्या आढळतात.
अजून् एक इंटलिंकिंगचं उदाहरण घेउ:-
अब्राहमाची एक् प्रसिद्ध कथा आहे , आपल्या देवावरील् निष्ठेबद्दल.
ज्यू-ख्रिश्चन मतानुसार अब्राहम आपल्या ईश्वर निष्ठेची साक्ष देण्यासाठी देवाला आपला धाकटा मुलगा आयझॅक( आयझॅक् हा ज्यूंचा-यहुद्यांचा पूर्वज,सराय ह्या पत्नीपासुन झालेला पुत्र ) अर्पण करतो ,बळी देउ इच्छितो. मात्र इस्लामिक मतानुसार अब्राहम ह्या पवित्र कामासाठी आपला थोरला मुलगा इस्माइल (अरबांचा पूर्वज, हग्गर ह्या दुसर्या पत्नीपासुन झालेला पुत्र ) ह्याला निवडतो.
ज्यूंच्या आणि ख्रिश्चनांच्या करारांत मक्का-मदिनेचा फारसा उल्लेख नाही.
(म्हणजे क्थेचा गाभा एकच, तपशिलातल्या नावात फरक, तोही सर्व् कथांमध्ये नाही. थोड्याफारच् कथांमध्ये फरक् आहे. बर्याचशा कथा समान् आहेत्. जिथे कथा समान् आहेत् तिथे इंटरप्रिटेशन् थोडं वेगळं आहे, हे मात्र कबूल्.)
ह्याच घटनेची आठवण म्हणुन आणि आपलीही ईश्वरनिष्ठा सिद्ध करण्यासाठी आजही "ईद्-उल्-अझा" म्हणजे "बकरी-ईद्" साजरी केली जाते.
इस्लामिक परंपरेत मक्का मदिना हे अब्राहमानच स्थापन केलेत(धार्मिक पवित्र पीठं म्हणुन) आणि वंशपरंपरेनं महंमदाकडे ते कसे आले(पक्षी:- महंमदानं ते काही नव्यानं स्थापन् केले नाहित्, तर् फक्त् पुनुरुजीवित् केले, समाजाला योग्य मार्गावर् आणण्यासाठी) ह्याचा उल्लेख इस्लामिक लिखाणांमध्ये आहे.
आपलाच
मनोबा.
समान कथा-वेगळा तपशील
>>(म्हणजे क्थेचा गाभा एकच, तपशिलातल्या नावात फरक, तोही सर्व् कथांमध्ये नाही. थोड्याफारच् कथांमध्ये फरक् आहे. बर्याचशा कथा समान् आहेत्. जिथे कथा समान् आहेत् तिथे इंटरप्रिटेशन् थोडं वेगळं आहे, हे मात्र कबूल्.)
भारतातही बर्याच समान कथा वैदिक, बौद्ध आणि जैन परंपरांमध्ये वेगवेगळ्या तपशिलाने सांगितलेल्या दिसतात.
(एक अवांतर शंका: भारतातल्या बौद्ध वाङ्मयात राम वगैरे कथा असतात तशाच चीनमधल्या जपानमधल्या बौद्ध वाङ्मयात असतात का?)
नितिन थत्ते
होय्.
जसं इब्राहिमी धर्म भूमध्य लगतच्या देश् आणि पर्शियन खाडीतले देश ह्या एकाच भूभागात विकसित होत गेले, व त्यांच्या बर्याअचशा कथा(व काही शिकवणी) एक सारख्याच राहिल्या तसच--
भारत वैदिक,बौद्ध, जैन परंपरांमध्ये खूपशा कथा सारख्या दिसतात. तथागत बुद्धाच्या जातक कथांमध्ये पौराणीक् कथांचे संदर्भ दिसतात.
पांडव व कौरव ह्यांचा पूर्वज्, सम्राट भरत ह्याचच वार्धक्यातील कथानक जैन तत्त्वज्ञानात "जड भरत" नावानं येतं.
(संदर्भः- परिव्राजक्, स्वामी विवेकानंद.)
अगदि भगवान श्री कृष्ण् हा ही जैन् परंपरेचा पाइक असल्याचं ऐकलय.
चीन व जपानमधल्या कथांचं माहित् नाही.
तिबेटात रामायण आहे. त्यात सीता रामाची बहिण आहे! (हे उपक्रमावरच एका प्रतिसादात फार् फार् पूर्वी वाचलय.)
मन.
दोन दोन भरत?
कौरव पांडवांचा पूर्वज भरत हा दुष्यंत शकुंतलेचा मुलगा. जैन कथांमधला भरत, बाहुबलीचा थोरला भाऊ, हा ऋषभदेवाचा मुलगा. (हे दोन एकच की वेगळे याची कल्पना नाही.)
जडभरताची गोष्ट जैन भरताच्या संदर्भात वाचली आहे. पण तो भरताच्या वार्धक्यातला जड भरत नाही. भरताने मरतेवेळी हरिणावरचे प्रेम/ आसक्ती मनात ठेवली, आणि (म्हणून) पुढल्या जन्मी हरिण म्हणून जन्मला. हरिण झाल्यावर त्याच्या लक्षात आले, की गडबड झाली. (मुक्तीच्या ऐवजी सापशिडीतल्या सोंगटीप्रमाणे पुन्हा मागेच आलो.) मग पुढचा जन्म त्याने नीट प्लॅन केला, आणि त्यानुसार एका सदाचारी ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला. या जन्मात आणखी घोळ नको म्हणून त्याने कधी तोंडच उघडले नाही. अवधूताप्रमाणे नि:संग राहू लागला. म्हणून त्याला "जड" म्हणू लागले. म्हणून तो जडभरत.
(अजून एक शंका अशी, की ही जर जैन कथा आहे, तर भरताने 'ब्राह्मणा'च्या घरात कशाला जन्म घेतला? एखाद्या धार्मिक जैनाच्या घरी जाऊ शकला असता ना!)
जैन मायथॉलॉजीमध्ये बरेच गोंधळवणारे संदर्भ आहेत. कृष्ण हा नेमीनाथाचा भाऊ असल्याचे संदर्भ आहेत. पण त्यासोबत ते महाभारताचे बाकीचे पॅकेज नाही, ते सगळे संदर्भ गायब आहेत.
सीता रावणाची मुलगी असल्याचे सांगणारे काही संदर्भ ऐकून आहे. सीता रामाची बहीण असल्याचा संदर्भ पहिल्यांदाच ऐकला. उपक्रमावरील दुवा देता काय?
राम सीता
भावंडं असल्याचा उपक्रमाचा दुवा सापडत नाहिये. पण तत्सम् इतर दुवे मिळाले ते असे:-
http://www.loksatta.com/daily/20031026/lmvadp.htm
http://www.boloji.com/hinduism/139.htm
http://www.indianexpress.com/news/in-the-tulsidas-ramayan-sita-is-not-ra...
http://www.oration.com/~mm9n/articles/dev/147Sri%20Rama.htm
वेगवेगळ्या परंपरांत त्यांचं नातं वेगवेगळं दाखवलय.
माझा तर्कः- शाक्य कुलात वंश शुद्धी टिकवण्याच्या उद्देशाने (प्राधान्याने) सख्ख्या भावंडातच विवाह होत. ह्याच शाक्य कुलात तथागत गौतम् बुद्धाचा जन्म् झाला. शाक्य कुलाची राज्ये आजच्या नेपाळ व नेपाळला लागुन असलेल्या भारताच्या भागात होती.(उत्तर बिहार, पूर्व्-उत्तर् (ईशान्य) यु पी. ह्या भागात).
(संदर्भः- रं ना गायधनी यांचं भारतीय् प्रशासकीय सेवेच्या प्रवेश् परिक्षेसाठेचं संदर्भ पुस्तक.)
त्याच्या सुरुवातीच्या अनुयायांत शाक्य जनतेचा बराच सहभाग असणार व साहजिकच त्यांचा प्रभाव तिथल्या साहित्यात पडणार. नेपाळ भौगोलिक सलगतेमुळे तिबेटला लागुन आहे.
तिथेही उत्तरकालात बुद्ध मताचा प्रभाव वाढला व त्यांनीही तीच कल्पना मानणं सुरु केलं.
कौरव पांडवांचा पूर्वज भरत हा दुष्यंत शकुंतलेचा मुलगा. जैन कथांमधला भरत, बाहुबलीचा थोरला भाऊ, हा ऋषभदेवाचा मुलगा.
(हे दोन एकच की वेगळे याची कल्पना नाही.)
मलाही खात्री नाही. स्वामींच्या पुस्तकात वाचलं इतकच.
(अजून एक शंका अशी, की ही जर जैन कथा आहे, तर भरताने 'ब्राह्मणा'च्या घरात कशाला जन्म घेतला? एखाद्या धार्मिक जैनाच्या घरी जाऊ शकला असता ना!)
ह्म्म्. विसंगती आहे खरी.
पण् केवळ जैनच नाही,कुठल्याही मायथॉलोजीमध्ये आजच्या तर्कानुसार आणि उप्लब्ध् माहितीनुसार विचार करत गेलं तर भयंकर् विसंगती आढळतील.
आपलाच
मनोबा.
सहमत आहे
माझ्यामते एकच आहेत. भरत आणि बाहुबली हे ऋषभदेवाचे मुलगे. रामायणातील भरताशी त्यांचा संबंध नाही आणि महाभारतातील भरताशीही नाही. :-) जसा चंद्रगुप्त मौर्याचा चंद्रगुप्त पहिल्याशी संबंध नाही तसेच.
सीता ही रावणाची मुलगी असल्याचे थायलंडमधील रामकथा सांगते.
राम-सीता भाऊ-बहीण असल्याचा संदर्भ
सकाळी वेळ नव्हता आणि दुवा शोधायचा होता म्हणून घाईत लिहिले नाही परंतु राम-सीता भाऊ-बहीण असल्याचा संदर्भ बौद्ध रामायणात आहे हे खरे असावे. मी बौद्ध रामायण वाचलेले नाही पण त्याबाबत असे संदर्भ वाचले होते. याबाबत आंबेडकरांचा एक लेख मिळाला तो येथे देते.
अवांतर - आंबेडकर
दुव्यात दिलेला लेख वाचला. सहज वाटून गेले, आंबेडकर स्वतः दलित होते, आणि अन्यायाचे दाहक चटके त्यांनी सोसले होते, त्यामुळे त्यांच्या विचारांमध्ये तीव्र प्रतिक्रिया दिसणे समजण्यासारखे आहे. पण जर त्यांनी बौद्ध धर्माऐवजी दुसरा एखादा धर्म स्वीकारला असता, तर बौद्ध साहित्याला त्यांनी इतकं प्रमाण मानलं असतं की (बौद्धांच्या प्रतिक्रियात्मक भाकडकथा म्हणून) उडवून लावलं असतं? प्रश्न केवळ जर तर चा नाही, तर त्यांची मते तटस्थ अभ्यासकाची आहेत, की अजेंडा घेऊन बनवलेली आहेत याचा आहे. असो.
अवांतरास प्रतिसाद
बौद्ध रामायणाबद्दल मला विशेष माहित नाही पण त्यात राम-सीता हे भाऊ-बहीण असल्याचे याआधीही वाचले आहे आणि त्या अनुषंगाने आंबेडकरांच्या लेखाचा दुवा दिला. त्यामुळे बौद्ध साहित्यावर यापेक्षा जास्त टिप्पणी करता येत नाही. आंबेडकरांच्या बाबत मात्र ज्या परिस्थितीतून ते गेले आणि ज्या धर्माचा त्याग त्यांनी केला, त्या धर्माचा त्याग त्यांच्या इतर जातीबांधवांनी करावा आणि तो करताना त्यांना हिंदू धर्माची काळी बाजू दाखवून द्यावी असा त्यांचा प्रयत्न असणे साहजिक आहे. इथे मुद्दा भाकडकथा* कोणत्या धर्माच्या असे नसून "इतर कोणताही धर्म आंबेडकरांनी स्वीकारला असता तरी हिंदू धर्माची काळी बाजू दाखवण्याची संधी वाया घालवली नसती." असे वाटण्याचा असावा. जो पटण्यासारखा आहे.
त्यांची मते तटस्थ असतील का याबाबत शंका आहे, अजेंडाही असू शकतो किंबहुना असावा पण त्यात काही गैर नाही. आपण सर्वच कोणत्यानाकोणत्या अजेंड्यावर जगत असतो. राहिला प्रश्न रामायणाविषयीच्या त्यांच्या मताचा तर रामाविषयी, वाल्मिकीविषयी आणि रामायणाविषयी ज्या काही तज्ज्ञांची** मते मी वाचली आहेत ती आंबेडकरांच्या मतांशी मिळती जुळती आहेत.
* भाकडकथा सर्वच धर्मांत असतात.
** उदा. राम शेवाळकर, आपले आवडते प. वि. वर्तक, जे.ए.बी. व्हॅन ब्युटेनन.
लेख
लेख चांगला आहे. वाचते आहे. आधीचाही लेख आताच वाचला. प्राचीन इजिप्शियन लोक आणि भारतीय लोक यात मोठे साम्य आहे असे दिसते. हे लोक मूर्तीपुजक, जीवनोपासक म्हणजे एक अर्थाने खरे हिंदूच होते का? नंतर नवीन पंथ निर्माण होऊन ते लयाला गेले असावेत का?
चांगली माहिती.
- शिवा
वाचतो आहे
मोठा आवाका घेऊन मोजके महत्त्वाचे तपशील देणं हे जाड ब्रशच्या फटकाऱ्यांनी विस्तृत कॅनव्हासवर चित्र काढण्यासारखं असतं. दमदार स्ट्रोक्सनी चित्र प्रभावी होऊ शकतं, झाडं लपून जंगल दिसू शकतं. तसं काहीतरी करण्याचा तुमचा प्रयत्न दिसतो आहे. शैली हलकीफुलकी ठेवलेली आहे, हेही आवडलं.
चित्र पूर्ण व्हायची वाट बघतो आहे. शुभेच्छा.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
सगळ्यांचे आभार्. काही उत्तरं...
तुम्ही सगळ्यांनी वाचलत, म्हणुन लिहायला अर्थ मिळतोय.
@प्रियाली:- इजिप्शियनांची माहिती इथं उपप्रतिसदात देणार होतो. पण चंद्रशेखरजींनी ती आधीच दिलिये.(बहुदा त्यांना स्वतःकडे बर्यापैकी माहिती असताना फार काळ् शांत राहवत नसाव. ;-) )
@चंद्रशेखरः- भारतीय देवतांचं उन्नयन हा अगणित काळ चालणारा भयंकर विषय् आहे. हडप्पा-मोहेंजोदडो मध्ये सापडालेल्या बैल-पूजेच्या कल्पनेत पुढं मानवीकरणाची भर घातली गेली आणि वैदिक रुद्र देवतेशी एकरूपता पावुन शिव्-श्ंकर देवता आली असं वाचलं. काही जण म्हणतात तसं वनवासींच्या ज्या देवता नागर तत्कालीन् भारतीय समाजानं उचलल्या त्यातली एक म्हंजे शंकर. मूळ रूपातील बैल पुढं नंदी-वाहन म्हणुन् टिकुन् राहिला म्हणे. पण हे सगळं भारताशी संबंधित आहे. आता थोडं इजिप्तबद्दलः-
इजिप्तमध्ये ग्रीकांचं आगमन/आक्रमण होण्यापूर्वीचा काळ मी सांगतोय.(पिर्यामिड् हे नक्कीच ग्रीकांच्या आगमनापूर्वीचे आहेत्.) आणि त्याही काळात त्यांच्या कडे मूर्तीपूजा होती. त्यापैकी एक् देवता सूर्य हीसुद्धा होती. प्रत्येक् बलशाली शासक स्वतःला देव् म्हणुन् चित्रित करी. आजही काही तत्कालीन तशी चित्रे उपलब्ध आहेत्.
@शिवा:- आपण वाचलत ह्यासाठी थँक्स्. चित्पावनांच्याच कुठल्याशा कुळवृत्तांतात ते भारताबाहेरुन आलेत असा दावा केलाय. ऐकल्यावर मलाही काही खरं वाटेना. कुठल्याशा गप्पांत चित्पावन् ही परशुरामाची मुले आहेत असही ऐकलय(परशुराम-त्यानं समुद्र मागं हटवुन् वसवलेली अपरान्त् भूमी-कोकण् वगैरे.इथं अपरान्त् केवळ म्हाराष्ट्राच्या नाही तर कर्नाटक आणि केरळच्याही किनार्याला,भारताच्य पश्चिम किनार्यालाच म्हटलय.). हा शोध काही चंद्रशेखर ह्यांनी स्वतः लावलेला नाही.त्यांच्या विधानामाग निश्चित असा काही रेफरन्स् असतो, वाचन असतं.उगाच कुठलाही अजेंडा नव्हे. हां, ती मते तुम्हाला ते पटतील अथवा न पटतील हा भाग वेगळा.
@थत्ते अंकलः- यथाशक्ती प्रतिसाद दिलाय वरतीच.
@प्रमोदजी:- तुमचे प्रतिसाद विशेष, खास,स्पेशल आहेत. त्यांच्यामुळं मला जास्त वाचुन् काळजीपूर्वक लिहावं लागतय्.(जमतय् की नाही हा भाग् वेगळा, पण तसा प्रयत्न् आहे.) बर्याच जुन्या गोष्टींवर ताण् देउन् आठ्वुन् लिहाव्या लागताहेत.
@आळश्यांचा_राजा :- जमेल ते वरतीच लिहिलय. असच टीकात्मक आणि अभ्यासु मूळ लेखावर लिहिलत आणि भर घातलित सगळ्यांचाच फायदा होइल्.
@घासकडवीजी :- जे सांगायचय् ते नेमक्यानं आणि अचूक सांगणं ही आपली शैलीच आहे.
तुम्ही म्हणता तसं काही जमलं तर स्वतःवर बेहद्द खुश होउ ब्वॉ आपण.
अवांतरः- शुद्धलेखन, प्रमाणभाषा वगैरेसाठी मूळ लेखात काळजी घेतोय. पण् प्रत्येक् प्रतिसाद काही तुपात तळल्यासारखा शुद्ध देणं जमेना झालय.
आपलाच
मनोबा
अवांतर
अवांतर:
फाफॉ वापरत असाल तर
https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/marathi-spell-checker/
येथे मराठीचा हन्स्पेल पॅक म्हणजे मराठीत स्पेलचेकर मिळेल तो लावल्यावर लेखनाचे काम त्यातल्यात्यात सोपे व्हावे. कदाचित हा प्रतिसाद खव मध्ये द्यायला हवा होता.
-निनाद
छान
पुढील भागाच्या प्रतीक्षेत
३००
झार्झेस राजा बद्दल अधिक माहिती इथे सापडली.
http://en.wikipedia.org/wiki/Xerxes_I_of_Persia
आणि अत्यंत रंजक म्हणजे, या मुद्रेत चक्क सौस्कृत/पाली शब्द आहेत. (क्षत्रिय क्षत्रीयनाम)
त्याचा विस्तृत भाग येथे आहे.
http://books.google.com/books?id=IisOAAAAIAAJ&pg=PA83&lpg=PA83&dq=khshay...
कोणी त्याचा मराठी अनुवाद करेल काय?
मराठीमाणूस
खालची माहिती मी फक्त मजकूर मोठा करण्यासाठी चिटकवली आहे.
३ फिनिशियन "३०० " नावाचा दे- दणादण हॉलीवूडपट पाहिलात? त्यात इराणचा राजा झर्क्सिस ग्रीसवर (अथेन्स व स्पार्टावर) जहाजांचा अफाट ताफा घेऊन, समुद्र ओलांडून हल्ला करतो असं काहीसं दाखवलंय.
अशी जहाजं बनवण्यात तेव्हा पर्शियन राज्य प्रगत नव्हतं. त्यांनी ती विद्या शिकली, जहाजं बनवून घेतली फिनिशियनांकडून.
फिनिशियन हे उत्तम खलाशी होते. लेबनॉन, सिरिया आणि इसराइल हे देश भूमध्य समुद्राच्या काठावर एका पट्टीत, एका ओळीने आहेत. ह्या तीनही देशांच्या किनारपट्टीवर विरळ लोकसंख्येने राहणारे लोक फिनिशियन. दूर दूर पर्यंत समुद्री प्रवास, समुद्र ओलांडून प्रवास करणारे हे पहिलेच. (त्यापूर्वी, समुद्री किनाऱ्यावरील कोळी समुद्रात जाऊन समुद्री जीव घेऊन परत येत. समुद्र ओलांडून जाण्याची आणि मग तिथून परत येण्याची नेहमीची सवय फिनिशियनांचीच. ) ह्यांनी आपल्या स्थानावरून निघून ग्रीसपर्यंत प्रवास केला.
आर
आर तिच्या! दोनी बी मर्तिकाची पेटीवाले एकाच बापाचे!
आसं?
आपला
अण्णा