संग्रहणीय की संग्राह्य?

डिस्क्लेमर्स-
१. प्रा. अशोक केळकरांच्या अभिनंदनाच्या चर्चेत व्यत्यय नको म्हणून ही वेगळी चर्चा आहे.
२. इथे कोणाचीही चूक दाखवायचा उद्देश नाही तर नेमक्या आणि योग्य शब्दाऐवजी दुसरे शब्द वापरल्याने असा अनर्थ होतो हे दाखवायचे आहे.

प्रा. केळकरांच्या रुजुवात पुस्तकाबद्दल पुढील अभिप्राय वाचण्यात आला.

वा! अत्यंत चांगले पुस्तक आहे. संग्रहणीय, विचारप्रवर्तक.

लेखकाला "संग्रहणीय" हा शब्द बहुधा "संग्राह्य" म्हणजे "संग्रहात ठेवण्याजोगा"या अर्थाने वापरायचा आहे हे लक्षात आले. तरी "संग्रहणी"या शब्दाचा अर्थ "हगवण, अतिसार" असा असल्याने त्यातून भलताच अर्थ निघू शकतो. म्हणून त्या ऐवजी नेहमीच्या वापरामधला "संग्राह्य" हा शब्द वापरावा असे वाटते. दोन्ही शब्दांचे मोल्सवर्थचे दुवे खाली दिले आहेत.

संग्रहणी

संग्राह्य

लेखनविषय: दुवे:

Comments

मी अर्धवट ज्ञानी

काहिच्या काहीपण अर्थ घेता यार तुम्ही लोक. . (मी फक्त हा धागा सुरु करण्यालाच बोलतोय. .) अशाच जर सामान्य माणसाच्या चुका काढत बसलात तर त्याला बोलायला जागाच राहायची नाही. . 'संग्रहणीय' या शब्दाचा अर्थ तुम्ही तुम्हाला भेटणाऱ्‍या शंभर जणांना थेट विचारा (ऑफलाईन विचारा कुठल्या वेबसाईटवर नाही) त्यातल्या एक दोघांनी जरी 'हगवण' असे उत्तर दिले तर अशी चर्चा करण्यात अर्थ आहे. .

प्रश्न थेट मलाच विचारल्याने उत्तर देतो आहे. अर्थ घेता म्हणजे नक्की काय? अर्थ शब्दकोशामध्ये दिलेला आहे, त्याचा दुवा चर्चेत दिला आहे. त्यामुळे अर्थ एकटा मीच घेत नाही तर पूर्वी सामान्य लोकही घेत हे स्पष्ट व्हावे. दुसरे म्हनजे धनंजय सामान्य नाहीत हे प्रियाली यांनी लिहिलेच आहे. संग्रहणीय शब्दाचा अर्थ ४० च्या पुढे वय असणारी व्यक्ती खात्रीशीर "संग्राह्य" असेच उत्तर देईल की नुसतीच हसायला लागेल? मला वाटते संग्रहणी होण्यासारखे असा अर्थ सांगेल. हा गोंधळ नको म्हणून हा धागा.

अर्धवट द्न्यान अद्न्यानापेक्षा हानिकारक असते. . .

हे मात्र लाखातले बोललात. आहोतच आम्ही अर्धवट त्याला काय करणार?

विनायक

अहो गोरे...

संग्रहणी ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही म्हणताय तोच...अगदी बरोबर...हगवण...असाच आहे. त्याबाबत दूमत नाही.
मात्र संग्रहणीय...हा शब्द त्याच्याशी निगडित वाटला तरी तसा नाहीये हे ही तितकेच खरे.

संग्रहणीय शब्दाचा अर्थ ४० च्या पुढे वय असणारी व्यक्ती खात्रीशीर "संग्राह्य" असेच उत्तर देईल की नुसतीच हसायला लागेल? मला वाटते संग्रहणी होण्यासारखे असा अर्थ सांगेल. हा गोंधळ नको म्हणून हा धागा.
आज मी जवळ जवळ ५९ वर्षांचा आहे...हे मुद्दाम नमूद करतोय...आणि माझे मराठी तसे बर्‍यापैकी चांगले आहे असे मी खात्रीने सांगू शकतो...त्यामुळे तुम्ही जो संग्रहणी ह्या शब्दाचा संग्रहणीय ह्या शब्दाशी संबंध लावताय तो निव्वळ बादरायण संबंध आहे...केवळ अक्षर साधर्म्य किंवा उच्चार साधर्म्य (प्रत्यय वगळता)आहे म्हणून असे म्हणताय ते ही पूर्णपणे चुकीचे आहे.

शब्दकोशातले संग्रह आणि त्या संबंधित काही शब्दांसंबंधीचे अर्थः
संग्रह (न)- एकत्रीकरण,गोळा करणे,ढीग,रास,संचय,साठा
संग्रह करणे(क्रि); संग्रहित(वि); संग्राह्य(वि)
संग्रहण (न)- गोळा/जमा करण्याची क्रिया
संग्रहण (न)- (ग्रं.शा.)नवीन पुस्तक ग्रंथालयात आल्यावर त्याची आवश्यक त्या तपशिलासह नोंद विशिष्ट पुस्तकात लिहून ठेवण्याची क्रिया.
संग्रहण केंद्र(न)-जे उपक्रम वारंवार करायचे असतात, अशांना लागणारे साहित्य/साधने एके ठिकाणी उपलब्ध व्हावीत म्हणून स्थापित केलेले केंद्र/जागा
संग्रहणी(पु)-अतिसार,हगवण

असो. तरीही तुम्हाला संग्रहणीय म्हटल्यावर हसावेसे वाटत असेल जरूर हसा!

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

संग्रहणीविषयक/संग्रहणीसंबंधित

असा एक अर्थ निघू शकत नाही काय? तसा अर्थ शब्दकोशात नाही हे उत्तर नाही कारण "संग्रहणीय" शब्दही मराठी शब्दकोशात नाही. त्यामुळे वाटेल तो अर्थ घ्यायला प्रत्येकजण मोकळा आहे.

असो.

हा हा हा

>>>>"संग्रहणीय" शब्दही मराठी शब्दकोशात नाही. त्यामुळे वाटेल तो अर्थ घ्यायला प्रत्येकजण मोकळा आहे.

च्यायला, मग इतकी चर्चा कशाला घडवून आणली.:)

-दिलीप बिरुटे

कोश आणि कोष

मराठीमध्ये साधारणपणे कोष हा शब्द, कीटकांच्या अळीच्या अंगाभोवती विणलेल्या आवरणासाठी, वस्तूंच्या संग्रहासाठी, वस्तुसंग्रह केलेल्या जागेसाठी आणि शब्दांखेरीज अन्य भाषिक शब्दसमुच्चयांच्या साठ्यासाठी वापरात आहे. निव्वळ शब्दसंग्रहासाठी कोश हा शब्द अधिक प्रचलित आहे. अर्थात, असा फक्त संकेत आहे, बेतोड नियम नाही!--वाचक्नवी

 
^ वर