श्रद्धा : काही उदाहरणे
श्रद्धेवर हल्ली इथे आणि इतरत्र बरेच लेख वाचायला मिळतात. या सर्व लेखांमध्ये कुणाचे तरी वैयक्तिक अनुभव आणि त्या अनुभवांचे स्पष्टीकरण असते.
हे अनेकवेळा वाचल्यानंतर राज ठाकरे जसे हमालांवर मराठी बोलण्याची सक्ती करतात पण अंबानींबद्दल मौन बाळगतात तसे काहीसे वाटले.
दुसरी बाजू मांडण्यासाठी श्रद्धेची ही काही उच्चभ्रू उदाहरणे.
१. अमेरिकन डॉलरवरील "इन गॉड वी ट्रस्ट"
२. आपली कोर्टातील गीतेवरची शपथ
३. नाताळच्या सुट्टीत अमेरिकन फिजिकल सोसायटीपासून क्यालटेकपर्यंत सर्व संस्था बंद असतात.
४. झेंडा म्हणजे काय? रंगीबेरंगी एक कापडाचा तुकडा. मग त्याला राष्ट्राध्यक्षांपासून सगळे जण वंदन का करतात?
५. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि दगडू माळी ही सर्व माणसेच आहेत. मग त्यांना देण्यात येणार्या वागणूकीत इतका फरक का?
६. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्री शपथ घेतात. शपथ म्हणजे काय?
सर्वसामान्य माणसे रोजचे आयुष्य जगण्यासाठीच युद्ध करत असतात. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सोई-सुविधांच्या नावाने बोंब
या सगळ्याशी संघर्ष करत असताना एखाद्याला श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळत असेल तर त्यात काय वाईट?
सर्वांकडून बर्ट्रांड रसेलच्या तर्कनिष्टतेची अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे?
Comments
हेच सांगितले होते ना
प्यायलाच बसला असेल एखाद्याचा गणपती (दूध हं!) तर त्याला थांबवायला माझ्याकडे उत्साह नाही. माझ्या घरातला पिऊ लागला तर पंचाईत आहे. ती मी होऊ देणार नाही पण माझ्या घरातला पितच (गणपती हं!) नसेल तर मी पिईल कधीतरी ही भीती "रोज" बाळगायचीही गरज नाही. प्यायला लागला तर त्याला यना-रिहॅबमध्ये पाठवता येईलच. ;-)
का बरे? असे होत नसावे असे वाटते का? या जोरात हसणारलाच आक्षेप आहे कारण आपल्या अंगाशी आले की काहीजण ते टाळून दुसरेच काहीतरी पाल्हाळ लावू लागतात.
हो ना म्हणजेच आपल्याला न पटणारी प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा आहे असे म्हणून झोडपण्यात काही हशील नाही. हेच सांगायचे आहे.
ठीक म्हणजे घरातली क्ष ही व्यक्ती प्रसाद खायला देवळात जाते त्यावर प्रतिष्ठितांच्या अशा वागण्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळते या उपप्रतिसादाला काहीच अर्थ उरत नाही खरे ना!
हो ना! तर मग याचप्रमाणे दत्तनामाचा जप करणे*, चमत्कार झाला असे वाटणे*, देवाची पूजा करणे* याही वैयक्तिक गोष्टी आणि अनुभव आहेत. नमते घेणे वि. आपल्याखेरीज इतर अंधश्रद्ध आहेत असे समजून झोडपणे आणि धांगडधिंगा घालणे यातला फरक समजून घ्यावा.
* या गोष्टींची भलावण चालली आहे असा कृपा करून प्रचार करू नये. :-)
तुम्हाला हे सांगायचे आहे काय?
न पटणारी प्रत्येक गोष्ट गणपती-दूध-पितो (किंवा होमीपदीत-नॅनो-टेक्नॉलजी) छाप नसते. उदा. मोगल साम्राज्याचा ऱ्हासासाठी मनसबदारी पद्धतच कारणीभूत ठरली, असे कुणी म्हटले आणि ती मला पटली नाही ह्याचा गोष्ट ती अंधश्रद्धा होत नाही. थेअरी ऑफ पॉप्युलेशन मला पटली नाही म्हणजे ती अंधश्रद्धा होत नाही. मात्र होमीपदीत-नॅनो-टेक्नॉलजी किंवा दीपक चोप्राचे आध्यात्मिक-क्वांटम-फिजिक्स ह्या गणपती-दूध-पितो छाप गोष्टी आहेत. अशा न पटणाऱ्या, फालतू, भंकस गोष्टी कोणी करू लागले तर त्यांना झोडपण्यात काही हशील नाही असे तुम्हाला सांगायचे आहे काय? उदा. कोणाला होमीपदीच्या गोळ्या लाभी ठरत असतील तर विज्ञानवाद्यांनी होमीपदीत विज्ञान नाही असे म्हणू नये, असे म्हणायचे आहे का?
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
मला जे म्हणायचे आहे
मला जे म्हणायचे आहे ते मी व्यवस्थित सांगितले आहे असे वाटते. तेव्हा उगीच होमिओपॅथीमधील नॅनो टेक्नॉलॉजी वगैरे कथा मध्ये आणू नयेत. मला जे सांगायचे आहे ते "मऊ लागले म्हणून" आणि त्यानंतरच्या सहस्त्रबुद्ध्यांना दिलेल्या प्रतिसादात व्यवस्थित आलेले आहे. जर आपल्याला वेड पांघरून पेडगावला जाण्यात धन्यता वाटत असेल तर मला वेळ घालवायचा नाही.
आभारी आहे
तुमच्यापरीने तुम्ही ते व्यवस्थितच सांगितले ह्याबद्दल शंकाच नाही. मीही माझ्यापरीने प्रयत्न केला आहे, करतो आहे.
पटू न शकणाऱ्या भंपकबाजीचे (अंधश्रद्धांचे) हे दाखले आहेत. न पटणारी प्रत्येक गोष्ट ही अंधश्रद्धा नसते. मात्र काही गोष्टी नक्कीच असतात.
आम्ही कुठेही जाणार नाही इथेच आहोत. वेळ दिल्याबद्दल अत्यंत आभारी आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
धन्यवाद
कुठे जाणार आपण? तेवढी ठिकाणे नसावीत उपलब्ध. ह. घ्या. आपले पेडगावही येथेच आहे याची खात्री आहे. आपल्या न पटणार्या काही गोष्टी अंधश्रद्धा असतात हे जितके खरे आहे तितकेच प्रत्येकाची श्रद्धा आणि अंधश्रद्धेची व्याख्या वेगवेगळी असते हे देखील या चर्चेतून दिसते किंवा दुसरा जर तुमच्या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणत असेल तर त्याचे वेगळे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्नही केलेला दिसतो तेव्हा एकमेकांना हिणवायचे, दुसर्याचे समजून न घेता धांगडधिंगा घालायचा, धादांत खोटे बोलायचे, वाक्ये आपल्याला हवी तशी ट्विस्ट करायची हे अयोग्य आहे आणि याचा विरोध नक्कीच होईल.
मऊ लागले म्हणून - २
अवश्य करा. किंबहुना, करालच याची खात्री आहे. मऊ लागले म्हणून हा प्रतिसाद वाचला असेलच आपण. :-)
नाही हं! सर्वच सफाई कामगार कसे होतील उपक्रमावर. झाले तर कंपनीचे दुकान चालायचे कसे? आम्ही आहोत ना अंधश्रद्धाळू, प्रबोधन करून घ्यायला.
वाचला आहे :-)
निर्दिष्ट प्रतिसाद वाचलेला आहे.
पुढील मुद्दे :
१. मऊ जमीन - एक वेगळा दृष्टिकोन
२. कंटाळा - असा मुद्दा असण्याबाबत सहमत; याबाबत "उपक्रमा"चे धोरण काय असावे
- - -
१. मऊ जमीन :
उपक्रमावर अंधश्रद्धाविरोधाचा तात्त्विक विरोध होतो, तो अन्य ठिकाणी झालेल्या विरोधापेक्षा वेगळा असतो.
जमीन वेगवेगळ्या ठिकाणी कमीअधिक मऊ असणार -हे अपेक्षित आहे? मऊ आहे तिथे अधिक खोलपर्यंत खणले जाऊ शकते. खोलपर्यंत खणण्याचा काही फायदा असेल, तर मऊ जमिनीपासून सुरू केलेले बरे. अधिक खोलावरती जर काही वेगळ्या प्रकारचे खडक असतील, तर त्यांच्यापर्यंत वर-वरून मऊ जमिनीच्या ठिकाणी पोचता येते.
खेड्यांमध्ये आणि सरहद्दीवर लोक तळमळत असताना आमचे काही आळशी शिक्षक शहरातल्या कॉलेजांत आतुर विद्यार्थ्यांना वैद्यक शिकवत होते! या मऊ जमीन बघून खणायाला घेणार्यांना भारत शासन पगार देते - इजेवर अपमानाचे लोण.
वैद्यकीय महाविद्यालयात ज्या खोलीपर्यंत मुद्दे चर्चिले जातात, त्यापेक्षा समाजामध्ये अन्य ठिकाणी वेगळ्या खोलीपर्यंत चर्चिले जातात. हे योग्यच आहे. वेगवेगळ्या ठिकाणी संवादकांकडे विषयांची प्राथमिकता वेगवेगळी असते आणि त्यामुळेच संवादाची गुंतागुंत वेगळी असते. हे असे आणखी एका क्षेत्रातले उदाहरण.
(वाटल्यास "प्रीचिंग टु द क्वायर"या गुळगुळीत शब्दप्रयोगाचा [क्लिशेचा] विचार करावा. चर्चमधील गानवृंदामध्ये जी चर्चा होते, ती खरोखर निरर्थक असते का? बिगर-चर्च वाद्यवृंदाचा मला तरी अनुभव आहे, आणि यातली चर्चा होयबा-होयबा नसते असा माझा अनुभव आहे. आता हे खरे आहे - अमुक प्रकारचे संगीत आस्वाद्य/सुंदर आहे, याबाबत सर्वच सहमत असतात. "हे संगीत म्हणजे शुद्ध गोंगाट" असे समाजातले काहींचे मत असते, त्या मताचा वकील कोणी तिथे नसतोच! मात्र त्यापुढच्या सांगितिक बाबतीत गायक-वादकांमध्ये अनेक मतभेद उद्भवतात. जर "आस्वाद्य की गोंगाट" या मतभेदाशी चर्चा आडली तर "स्वरमेळ की सुरावट आस्वाद्य" हा विचार व्हायची वेळच येणार नाही. आणखी एका क्षेत्रातले उदाहरण.)
- - -
२. त्याच त्या विषयांबाबत कंटाळा
आणखी एक सुयोग्य मुद्दा वरील संवादात आला आहे - तो आहे "कंटाळ्या"चा.
उपक्रम संकेतस्थळावर जे वैविध्य दिसेल त्या अपेक्षेने काही वाचक येतात, ते वैविध्य दिसले नाही म्हणून कंटाळा येतो. यामुळे उपक्रम स्थळाची लोकप्रियता कमी होईल ही शक्यता आहेच.
वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा "बातम्या", "संपादकीये", वेगवेगळ्या प्रकारच्या "पुरवण्या" यांचे काही विवक्षित प्रमाण राहील म्हणून प्रयत्न करतात. असे करताना ज्या सदरांचे लेख फार असतील, त्या सदरामधील काही लेख प्रसिद्ध करत नाहीत. जिथे लेख कमी असतील, तिथे मुद्दामून लेखकांना आमंत्रण देतात. त्या माध्यमात असा निर्णय करण्याची जबाबदारी असलेले संपादन मंडळ असते. हे सर्व योग्यच आहे.
सध्या तरी उपक्रमावरती तशी सोय नाही. येथील संपादन मंडळ सेवाभावी (बिनपगारी) आहे, असेच ऐकलेले आहे. माझ्या अनुभवात तरी (ललित साहित्य सोडले तर) लेख नकारायचा प्रघात नाही. अशा परिस्थितीत वैविध्याचा समतोल साधण्यासाठी काय करावे - अमुक विषयावरचे लेख बंद करता येत नसतीलच तर अन्य प्रकारचे लेख लिहिण्यास लेखकांनी एकमेकांना उद्युक्त करावे.
आहे त्या धोरणात जर एकरंगीपणा होत राहिला, आणि तो असह्य झाला आणि संकेतस्थळाचे नुकसान झाले, तर काय? तर संकेतस्थळ मालकाने संकेतस्थळाचे धोरण बदलावे. (उपक्रम दिवाळी अंकात वैविध्य असावे, म्हणून संकेतस्थळ मालक विशेष प्रयत्न करतात. म्हणजे अशा धोरणास संकेतस्थळ मालकांचा तत्त्विक विरोध नसावा. तरी हे धोरण कष्टसाध्य असावे. वर्षभर असे धोरण राबवावे का? याच्या फायद्या-तोट्याचे विश्लेषण मालकांनी विश्वासू सल्लागारांसोबत करावे.)
- - -
या चर्चेतील अनेक प्रतिसाद (माझा हा उपप्रतिसाद सुद्धा) मूळ चर्चाविषयापासून दूर जातो आहे. या प्रतिसादांचा वेगळा धागा करावा अशी विनंती.
अवांतर नसावे
अंधश्रद्धा विरोधाला विरोध होतो आहे असे म्हणणे चुकीचे वाटते. विकास यांनी गंमतीत तसे म्हटले असावे कारण इथे होणार्या अतिरेकाला ते कंटाळले असावेत. (हा अंदाज माझा.) परंतु, उपक्रमावर अंधश्रद्धा विरोधाला विरोध होतो हे मांडणे अयोग्य आहे. विरोध आहे तो बाळबोध लेख लिहून तिच तिच रेकॉर्ड पुन्हा वाजवत राहायला, नवे काही न सांगता इथला प्रत्येकजण (बहुधा आपले सोजीर सोडून) अंधश्रद्धा पिडीत आहे अशी मनोधारणा करून घ्यायला. याचा त्रास इतरांना होतो याची जाणीव नसल्याला.
आणि कठिण ठिकाणी प्रयत्नच करायचे नाहीच. मऊ जमीन खणून खणून काहीही हाती लागत नाही हे लक्षात आले तरी खणत राहायचे याचाच कंटाळा आला आहे. तेव्हा वेगळी जमीन बघा किंवा खणण्याचे तंत्र बदला हेच तर सांगते आहे. :-)
नव्हे नव्हे आपला गैरसमज दिसतो. वर गाडगेबाबांचे उदाहरण आहे ना तेच चपखल आहे. आळशी शिक्षक पोटासाठी व्यवसाय करतात. समाजसुधारणा हा त्यांचा हेतू नसतोच. तेव्हा आपले उदाहरण चालणार नाही. ही उगीच दिशाभूल वाटते.
ढोबळमानाने या मुद्द्याशी सहमत आहे. माझ्यामते आक्षेपार्ह विषय सोडून कोणत्याही विषयांवरील लेख बंद करण्याची गरज नाही परंतु उपक्रमाला साजेसे लेख आपण मांडतो का हे पाहणे गरजेचे आहे. व्यक्तिगत अनुभवाची उदाहरणे देऊन लेख टाकले तर दिवसाला २ लेख मलाही पाडता येतील आणि इतरांनाही. (तेवढा वेळ आणि उत्साह नाही ही गोष्ट वेगळी.) आपण कोणाला काय सांगतो आहोत, आपला टारगेट ऑडियन्स कोण आहे याची जाणीव लेखकाला हवी. शेवटी, तुम्ही जर इतरांना मूर्खातच काढत असाल तर त्या व्यक्तींना एक दिवस कंटाळा येणे साहजिक आहे.
मला वाटते हे प्रतिसाद अवांतर नसावेत. ज्या उद्देशाने लेख टाकला आहे त्याला धरून असावेत. अर्थातच, लेखकाला अवांतर वाटले तर हलवणे इष्ट. त्यांच्या खरडवहीत दुवा टाकते आहे.
नाही
मला प्रतिसाद अवांतर वाटले नाहीत. कंटाळ्याशी निगडीत आहेत.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना
बरोबर
विकास यांनी गंमतीत तसे म्हटले असावे कारण इथे होणार्या अतिरेकाला ते कंटाळले असावेत.
अर्थातच गंमतीत म्हणले होते. म्हणूनच मी नुसते "नारळ फोडीन" म्हणले, कुणासमोर अथवा कुणाच्या डोक्यावर हे काहीच लिहीले नव्हते ;)
अंधश्रद्धा निर्मूलनाला माझा देखील विरोध नाही. कसे करावे ह्या संदर्भात मतभेद असू शकतात. तसेच दुसरा मुद्दा जरी कोणी अंधश्रद्धाळू असले तरी त्याला अडाणी म्हणणे अथवा तुच्छ समजणे मला पटत नाही. तशा (तुच्छतेच्या) सुराच्या बाबतीत मात्र माझा मतभेद नसून विरोध आहे. केवळ तुच्छ लेखले म्हणूनच नाही, तर त्यातून होणार्या अडमुठ्या विरोधाने, मूळ कार्याची हानी होण्याचीच जास्त शक्यता असते म्हणून.
--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
सहमत
सर्व मुद्यांवर सहमत आहे. नारळ फोडण्याशी सुद्धा. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना
सहमत
उपक्रमावर तेच तेच लेख येण्यापेक्षा थोडे वेगळे लेख यावेत किंवा अशा लेखांसाठी वेगळी जमीन शोधावी असे मला वाटते.
सहमत आहे. दर दोन दिवसांनी एक नवीन चमत्काराचे वर्णन आणि त्याचे स्पष्टीकरण यातून प्रबोधन होते आहे असे वाटत नाही. त्याऐवजी धनंजय यांनी टाकलेली रसेल यांच्या विचारांची लेखमालिका वाचायला नक्कीच आवडेल.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
नुकसान
या व्यक्तीस प्रतिष्ठा असेल तर "ही व्यक्ती करते मग आपणही करू" असे अनेकांना वाटते. झुंड जेव्हढी मोठी तेव्हढे त्यांना सुरक्षित वाटते. अशा लोकांपैकीच कोणी मालेगावला बाँब फोडायला गेला तर?
प्रतिष्ठित लोकांच्या कृतीचे दूरगामी परिणाम होऊ शकतात म्हणून उपक्रमसारख्या जागी प्रबोधन करण्यास अधिक महत्व आहे. अंगारा काढणे, निखार्यांवर चालणे, असले जादूचे प्रयोग आणि निर्माल्यदान, बोकडबचाव अशी कामे अनेकजण करतातच.
सवयीचा भाग आणि अंधश्रद्धा यांत फारसा फरक नाही. 'रीत-पद्धत' फायदेशीर आहे की नाही ते तपासलेच पाहिजे.
सीमेवर जाऊन कोणीतरी मरावे अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार म्हणून मी चित्रपटगृहात राष्ट्रगीतासाठी उभा राहतो. माझे पॉपकॉर्न सांडले तरी परवडते. खासगीत तसे केले नाही की त्यास हिशोबी विवेक म्हणता येईल.
हास्यास्पद
अमेरिकेहून डायरेक्ट मालेगाव! हाहाहाहा!!!!!! मारुती लाजला असेल हं आमचा. त्याला वाटायचं की प्रचंड उडीचा मक्ता केवळ त्याचाच. ;-)
अबब! साप साप असं बोंबलत दोर्या धोपटायची सवय झाली आहे असं म्हणा ना.
मान्य आहे. काय करावे बरे या रिकामटेकड्या अंधश्रद्धाळू लोकांचे?
ताणलेली कल्पनाशक्ती?
प्रतिष्ठितांच्या वागण्यामुळे देवधर्माला प्रतिष्ठा मिळण्यात मदत होते. धर्माची रचना दुरुपयोग करणे सोपे व्हावे अशीच आहे.
उपक्रमवर प्रतिष्ठितांच्या प्रबोधनास्तव लेखन केले जाते. जादूच्या प्रयोगांपेक्षा ते अधिक आवश्यक आहे.
माझा रास्त संशय असा की तुम्हा लोकांना कंटाळा आला नसून चंचुप्रवेशच हाणून पाडायचा आहे. आवडत्या रुढींवर टीका टाळण्यासाठी Aragorn यांनी "विवेकवादी नाही का रुढी पाळत? मग तेही आमच्याच पातळीवर!" असा युक्तिवाद केला आहे.
चंचुप्रवेश
प्रतिष्ठितांच्या वागण्यामुळे देवधर्माला प्रतिष्ठा मिळण्यात मदत होते. धर्माची रचना दुरुपयोग करणे सोपे व्हावे अशीच आहे.
आपण प्रतिष्ठित आहोत तर आपण आपले वागणे बदलावे (नव्हे ते बदलले असावेच, अशी खात्री आहे), दुसर्यांना एवढा जालीम डोस होईल एवढा आग्रह का?
असो. खालील काही प्रश्नांची उत्तरे ऐकणे रसपूर्ण होईल.
समजा, आपल्याला सत्यनारायण आवडत नाही, पण कोणी प्रसादाला बोलावले तर जाऊच नये का? किंवा गेले तर प्रसाद खाऊ नये का? का खाल्ला, तर मी प्रसाद खातो, पण या तुमच्या भाकड पूजेवर माझा विश्वास नाही, असे स्पष्ट म्हणावे? तशात हा माणूस आपला बॉस असला, तर काय कराल? का न जाण्यासाठी दुसरे काही काम आहे म्हणून खोटे बोलावे? किंवा काही न बोलता गप्प बसावे, ही आत्मवंचना नाही का? का आपल्या घरी सत्यनारायण न करणे, त्याऐवजी दुसरे काही पर्याय तयार करणे हा उपाय अधिक प्रतिष्ठित आणि दुसर्याला न दुखावता काही शिकवणारा आहे? असो.
आवडत्या रुढींवर टीका टाळण्यासाठी Aragorn यांनी "विवेकवादी नाही का रुढी पाळत? मग तेही आमच्याच पातळीवर!" असा युक्तिवाद केला आहे.
या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले जात नाही आहे.
मुळात रूढी हा समाजाचा भाग म्हणून येतात, जर पटत नसल्या तर वेगळ्या समाजाची कास धरावी. अशा समाजाची निर्मिती ही समाजात असलेल्या माणसांमधून करायची असल्यास त्यांना मूर्ख समजू नये, असे म्हटले तर काय चुकले?
उत्तरे
एकाच सूर्यमालेत आहोत ना! विहिंपला अमेरिकेतून पैसे येत.
माझे वडील जातच नाहीत. मी जातो आणि स्पष्ट बोलतो.
मैत्री नसेल तर मी स्पष्ट सांगतो की या विषयावर मी सहकार्यांशी चर्चा, व्यवहार, भेटीगाठी करीत नाही कारण माझे मत सांगितले तर भावना दुखावल्या या सबबीखाली नोकरीत अडचण होऊ शकते. मैत्री असेल तर माझे मत सांगतो.
गॉडः मी अमेरिकन नाही.
गीता, नाताळ, झेंडा, राष्ट्रपती, शपथ: उत्तर दिले आहे.
राममोहननी बेंटिंकला असे सांगितले नाही ही देवाची कृपा!
निमूटपणे यनाख्यान ऐकले तर उत्तम. शहाजोग समन्वयवाद चालणार नाही. झोपलेल्याला जागे करता येते पण ...
हम्म
एकाच सूर्यमालेत आहोत ना! विहिंपला अमेरिकेतून पैसे येत.
विहिंपचा इथे काय संबंध? तुम्ही मासे खाता पण तुमचा शेजारी खात नाही, तुम्ही त्याच्या बिल्डिंगमध्ये राहता, म्हणून तुमच्या घरात शिजवलेल्या माशांचा वास माझ्या घरात आला नाही पाहिजे असे त्याने म्हटले तर? दुराग्रह तो दुराग्रहच. माझे माझ्या घरात मासे खाणे पटत नाही, तर बिल्डिंगमध्ये राहू नका असे म्हणणे सयुक्तिक होईल.
मी जातो आणि स्पष्ट बोलतो.
तुम्ही जाऊन दुसर्याचा अपमान करता असे कोणी म्हटले तर? स्पष्ट बोलल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया काय होते हे समजून घ्यायला आवडेल.
राममोहननी बेंटिंकला असे सांगितले नाही ही देवाची कृपा!
वेगळ्या समाजाची म्हणजे जे वेगळे विचार करतात अशांची. जर समाजात राहून काम करायचे असले तर ते उदाहरणाने, कायदेशीरपणे करावे. आधी सुरूवात मी आधी एका ठिकाणी म्हटले आहे तशी हे व्यवसाय म्हणून नोंदणी करून करावी, म्हणजे ते कायद्याच्या कक्षेत येतील.
निमूटपणे यनाख्यान ऐकले तर उत्तम.
सॉरी, जमणार नाही.
शहाजोग समन्वयवाद चालणार नाही. झोपलेल्याला जागे करता येते पण ...
शहाजोगपणा काहीही नाही. झोपेचे सोंग मी घेतलेले नाही. माझे लग्न होऊन दशकाहून अधिक वेळ झाला आहे, पण माझ्या घरात मी एकदाही सत्यनारायण घातलेला नाही. गणपतीत चांदीचा गणपती ठेवून गणपती "बसवते", आरत्या म्हणते, मोदक करते, कारण तो माझ्या पोरीला आवडतो. गणपती झाले की उचलून ठेवते, परत पुढच्या वर्षी तोच "बसवते". उद्या म्हणाल गणपती बसवणे ही बंद केले पाहिजे, तर चालणार नाही. माझ्या घरात मी काय करावे, आणि काय नाही हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला (म्हणजे माझ्या जवळचे प्रेमाचे लोक सोडून कोणाही इतर क्ष व्यक्तीला नाही).
याच न्यायाने -
१. लग्नात दारू देणे बंद करावे.
२. लग्नात नाचणे बंद करावे.
३. घरात किंवा दारात मासे/कोंबडी शिजवणे बंद करावे.
४. पोवळी/मोती यांचे दागिन्यातले वापर बंद करावे.
असले कुठचेही फतवे काढण्यास माझा विरोध राहील. कुठच्याही पद्धतीच्या एकांगी, हेकेखोर आग्रहास नक्की विरोध आहे/राहील.
अंशतः मान्य
बिल्डरशी करार करताना अट घालावी की बिल्डर मांसाहार्यांना इतर फ्लॅट विकणार नाही. त्याला वास आवडत नाही हा त्याचा दोष आहे. माशांचा वास घातक (उदा. ध्वनिप्रदूषण) नाही.
पण भाड्याची घरे शोधताना मी खोटे न बोलून अनेक घरमालकांचा नकार ऐकला आहे. स्वयंपाकघरासाठी ऍक्टिवेटेड चारकोलच्या चिमण्या मिळत असतील तर सोय होईल.
माझ्या अनेक 'मित्रांचे' मत आहे की मी मुळात अपमान करण्यासाठीच वेगळा वागतो!
हे खरे आहे की लोक दुखावतात. आम्हाला आंबट द्राक्षे नकोतच.
बंगालमध्ये सतीची प्रथा होती. तिला उपर्या बेंटिंकने विरोध केला. त्याऐवजी राममोहननी परदेशी जायला हवे होते का?
आम्ही बर्यापैकी आदर्श उदाहरण असे वागतो आणि "धावा धावा मूर्ती फोडा" असे काही बेकायदेशीरही म्हणत नाही.
१ कृती अंधश्रद्ध नसू शकते - त्यामागचा उद्देश पहावा, असे प्रमोद सहस्रबुद्धे यांनी नमूद केले आहे.
२ कृतींवर बंदी नाही, हेटाळणी/टीका झाली तर काय अडचण आहे? संभाषणस्वातंत्र्य नाही का?
पोवळे, मोती यांना सँडल घालणार्यांचा ('गाया'वाले) विरोध असतो.
अनुभवातून
हे खरे आहे की लोक दुखावतात.
म्हणजे फायदा काय होतो? स्वतः आपण लोकांपेक्षा वेगळे आहोत हे दाखवण्याखेरीज काय हाती येते? (यात तुम्हाला नावे ठेवण्याचा उद्देश नाही, पण हेच मी होताना पाहिले आहे).
जर तुमच्या वागण्याने एका व्यक्तीला तरी असे वाटले की "अरे, खरेच, आपणही असे करून पाहू तर खरे, काय वेगळे होते", तर तुम्ही काही साध्य करू शकलात. नाहीतर तेलही (लोकांना बदलण्याची संधी) गेले आणि तूपही (मैत्री) गेले आणि हाती धुपाटणे (निरूपयोगी हेकेखोरपणा) राहिले असे होते.
हेच प्रियाली, विकास आणि आरागॉर्न सांगत आहेत असे वाटते.
कृतींवर बंदी नाही, हेटाळणी/टीका झाली तर काय अडचण आहे? संभाषणस्वातंत्र्य नाही का?
असे नाही. टीका करूच नये असे मी म्हणत नाही, पण जेव्हा ही टीका अस्थानी आणि सातत्याने होते, तेव्हा ती हेकटपणाची होते. हेटाळणी करू नये असे मात्र वाटते, कारण वर दिल्याप्रमाणे. तेलही गेले, तूपही गेले..
तिला उपर्या बेंटिंकने विरोध केला. त्याऐवजी राममोहननी परदेशी जायला हवे होते का?
नाही. त्यांनी सतीची प्रथा बदलावी यासाठी प्रयत्न केले. तशीच प्रथा बदलायची असली, तर लोकांत राहून प्रयत्न करावेत. हिणवून/लोकांना कमी बुद्धीचे, हिणकस लेखून हे कधीही साध्य होणार नाही.
कृती अंधश्रद्ध नसू शकते - त्यामागचा उद्देश पहावा, असे प्रमोद सहस्रबुद्धे यांनी नमूद केले आहे.
हेच कोणी ठरवायचे?
एक उदाहरण देते - वेगळे वाटेल पण तसेच आहे.
माझे आईकडचे आजोबा अतिशय बुद्धिमान, आणि जुन्या काळात उच्च इंग्रजी शिक्षण घेतलेले असे होते. जुन्या काळी इंग्लंडला जाऊन आले होते, तेथील वातावरणाची आणि कडक शिस्तीची सवय होती. स्वभावाने फटकळ आणि स्पष्टवक्ते, त्यामुळे खरेतर प्रेमळ असूनही आम्हा नातवंडांपासून काहीसे दूरच राहिले, त्यांच्या बुद्धिमत्तेचा, व्यासंगाचा फायदा समाजाला जसा झाला, तसा घरातल्यांना झाला नाही. घरातले आणि दारातलेही तसे काहीसे वचकून लांबच राहिले.
असो.
वेगळे मत
'त्यां'चे मठ्ठ वागणे मूकपणे बघून आणि त्यात सहभागी होऊन माझ्या भावना दुखावतात, वाटते "हे माझ्यासारखे मानव आहेत?". किंबहुना मी बोलतो तसा 'चालतो' की नाही यावर भाष्य करायला ते टपून असतात. निमूटपणे त्यांच्या समारंभात जातो पण नंतर कधीतरी चर्चेत त्याचा संदर्भ देऊन "तेव्हा कुठे गेला होता (नि)धर्म" असे विचारतात.
शिवाय कधी ना कधी परिवर्तन होईल अशी आशाही (स्पष्ट बोलण्यात) असते.
"या युक्तिवादाला प्रत्युत्तर दिले जात नाही आहे." हे आपले मत बदलले असेल असे वाटते. प्रियाली, गुंडोपंत आणि आरागॉर्न यांचे मतपरिवर्तन झाल्याची चिन्हे नाहीत.
ते "पडलो तरी नाक वर" असे सांगून विज्ञानाचे श्रेष्ठत्व नाकारीत आहेत. समन्वयाचा प्रयत्न हा आमचा अपमान आहे.
समन्वयाचा दावा हा प्रबोधनास केलेला शहाजोग विरोध आहे. संवाद (!=प्रवचन) नको म्हणणार्यांना टीकेने बेजार करणे हा एकच उपाय आहे.
बेंटिंकने "तुरुंगात घालू" सांगून सतिबंदी केली.
बरोबर!
म्हणूनच अंधश्रद्धाजन्य रूढींची कृतीसुद्धा सामाजिक जीवनात करू नये असे सांगतो.
पडलो तरी नाक वर
असे कोठे बरे विज्ञानाचे श्रेष्ठत्व नाकारले? जरा दाखवून द्यावे.
भलतेच
हे काय भलतेच. असे पुरावे नसतात काही विचारायचे.. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
संदर्भ
विज्ञानविरोधः
हा मॅनरलेस संदर्भ संपादित करण्यासाठी:
पडणे:
रीत-पद्धत म्हणून कृती करणे चूकच आहे. प्रसादाची चव आवडली, गायत्री मंत्राची चाल/शब्द/अर्थ आवडले, कन्यादानाच्या कृतीतून प्रेम व्यक्त होते असे वाटले, तर मान्य आहे. पण मूर्तीसमोर रुपया/डॉलर ठेवण्यात आनंद मिळू शकतो हे अविश्वसनीय आहे.
नाक वर करणे:
होयबांचे नाकः
मठ्ठ, अमानवी
'त्यां'चे मठ्ठ वागणे मूकपणे बघून आणि त्यात सहभागी होऊन माझ्या भावना दुखावतात, वाटते "हे माझ्यासारखे मानव आहेत?"
याच प्रकारे शाळा/कॉलेजातील शिक्षकांनीही शिकवताना समोर मूढमती, मठ्ठ मुले बसली आहेत असेच समजून शिकवण्यास आपला विरोध नसावा. एखाद्या मुलाला काही कल्पना समजायला अवघड जात असल्या तर त्याची बुद्धीच नाही, ते खरेच मानव आहेत का? असाच विचार करून शिकवावे.
शिवाय कधी ना कधी परिवर्तन होईल अशी आशाही (स्पष्ट बोलण्यात) असते.
अशी आशा जरूर ठेवावी. पण परिवर्तन हे वेगळे पर्याय दिल्याने होते, ते पर्याय कन्स्ट्रक्टिव्ह असावे लागतात.
प्रियाली, गुंडोपंत आणि आरागॉर्न यांचे मतपरिवर्तन झाल्याची चिन्हे नाहीत.
मी गुंडोपंतांचे नाव घेतले नव्हते.
असो. आणि कसले मत परिवर्तन करायचे? विज्ञानवादाची कास धरणे म्हणजे लोकांपासून फटकून सातत्याने त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या प्रत्येक कृतीवर संशय घेत राहणे करू नये असे आम्ही सगळे सुचवत आहोत तेव्हा मतपरिवर्तन करावे असे तुम्हाला तरी वाटते आहे का? मग काय गणपती साजरे करतो, त्याने अंधश्रद्धा वाढते, म्हणून ते करू नयेत; उद्या थँक्सगिव्हिंगला फक्त थँक्स द्यावे, टर्की आणू नये; मद्य पिऊ नये; हॅलोवीनला मुलांना ड्रॅक्युला/भुते/पर्या यांचे ड्रेस घालू नये, असले फतवे निघाले तर ऐकून घ्यायचे का? आणि हा सगळा वेळ वाचला तर तो कुठे घालवायचा ह्याचेही फतवे काढले जातील याची खात्री वाटते.
समन्वयाचा प्रयत्न हा आमचा अपमान आहे.
जे तुमच्यासारखे नाहीत अशा लोकांच्या बुद्धीला कमी दर्जाचे, हीन लेखणे हा त्यांचा अपमान आहे. फिट्टम फाट.
समन्वयाचा दावा हा प्रबोधनास केलेला शहाजोग विरोध आहे. संवाद (!=प्रवचन) नको म्हणणार्यांना टीकेने बेजार करणे हा एकच उपाय आहे.
बेंटिंकने "तुरुंगात घालू" सांगून सतिबंदी केली.
अच्छा?! मग आता घालाच तुरूंगात जे तुमच्याविरोधी बोलतात त्यांना. किंवा टिकेने बेजार करा. (ज्यांना पेशन्स नाही अशा सर्वांना फुलटाईम अपत्यसंगोपन करायला लावले पाहिजे असे माझे आता मत झाले आहे).
म्हणूनच अंधश्रद्धाजन्य रूढींची कृतीसुद्धा सामाजिक जीवनात करू नये असे सांगतो.
ह्यासंबंधीच्या फतव्यांचीच वाट पाहत आहे.
फरक
समजाऊन सांगायला मी नेहमीच तयार असतो.
झोपलेल्याला जागे करता येते. "मी झोपलो आहे, झोपणेच चांगले, तुम्हीपण झोपलेले आहात" असे कोणी आडमुठे बनले तर नाईलाज आहे.
सगळे? 'तुमचा कंपू' असे म्हणायचे आहे का?
कृती आनंददायक असल्याचा दावा केल्यास कृतीला विरोध नाही. हातात निरांजन धरून गोलगोल फिरविण्याची मौज (फुलबाजीप्रमाणे) वाटत असेल असे मानले तरी ते मूर्तीसमोर करून काय साधते? आणि मूर्तीला नमस्कार करण्यात कोणत्या ज्ञानेंद्रियाला गंमत वाटते?
नुसतेच आमच्यासारखे नाहीत हा आरोप नाही. ते आमच्यापेक्षा कमी आहेत हा दावा आहे. दाव्याच्या सत्यासत्यतेची चर्चा जरूर करा. दावा सिद्ध झाल्यावर/चर्चा करणे टाळल्यास कमी लेखणे हा अपमान कसा? ती त्यांची रास्त लायकी आहे!
तुरुंग/फतवे यांची गरज नाही. टीका झोंबते.
विषय
नेहमीप्रमाणे तुम्ही विषय भलतीकडे फिरवला आहे. कंपूचा काही संबंध नाही. इथे जे लोक सांगत आहेत असे वाटते ते लिहीले. यापैकी प्रत्येकाशी माझी किंवा माझ्याशी त्यांची मते जुळतात असे नाही, वादही झाले आहेत/होतात/होतील.
ते आमच्यापेक्षा कमी आहेत हा दावा आहे. दाव्याच्या सत्यासत्यतेची चर्चा जरूर करा. दावा सिद्ध झाल्यावर/चर्चा करणे टाळल्यास कमी लेखणे हा अपमान कसा? ती त्यांची रास्त लायकी आहे!
तुमच्या श्रेष्ठत्त्वाच्या दाव्याची चर्चा करण्याइतका मला यापुढे खरेच रिकामा वेळ मिळेल असे वाटत नाही तेव्हा धन्यवाद.
मऊ माती
पूर्ण सहमत! पांढरपेशा लोकांचे प्रबोधन करणे हे सर्वात कठीण. इतर स्थळांवरच्या 'मेंढरपेशा' लोकांना हाकायला काय लागते हो? थोडी पुंगी वाजवली की अनेक साप डोलायला लागतात (अगदी खिशातले पैसेही काढून देतात हे आपण पाहिलेच आहे.)
खरी टणक जमीन इथेच आहे. गुंडोपंत, आरागॉर्न, प्रियाली ह्यांचे प्रतिसाद वाचले की लक्षात येईल वरुन माती मऊ वाटत असली तरी त्यात किती धोंडे आहेत.
वसुलि
वसंत सुधाकर लिमये
करूनच बघा
आपण सोडून इतर सर्व अंधश्रद्ध अशी झापडे डोळ्यांवर बसवणार्या अंधश्रद्धांनी आमचे प्रबोधन करूनच पाहावे. :-) माझा पाठिंबाच आहे आपल्याला.
उदाहरणे
हा काय ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणायचे का? पहा अमेरिका सुद्धा देवावर विश्वास ठेवते असे म्हणायचे का?
कुराण बायबल सदसद विवेक बुद्धीला स्मरुन देखील शपथ घेता येते.
पारंपारिक सोय
निष्ठा ठेवण्याचे प्रतिक आहे. समूह जीवनात प्रतिकांची गरज भासते. मानवी मेंदुला ही प्रतिमेची गरज लागते. झेंड्याला वंदन करुन राष्ट्रद्रोही कृत्य करणारे निष्ठावंत(?) आहेतच की
सर्व माणसे समान नसतात. बुद्धीमत्ता कार्यक्षमता उपयुक्तता यात फरक असतो. फरक आहे म्हणुन जग आहे सगळेच चोर असतील तर साव कुणाला म्हणणार? (अथवा उलट)
शपथ म्हणजे वादा! जो वादा किया वो निभाना पडेगा याची किमान जाणीव तरी यातुन होते
प्रकाश घाटपांडे
गैरसमज
>हा काय ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणायचे का? पहा अमेरिका सुद्धा देवावर विश्वास ठेवते असे म्हणायचे का?
ईश्वरावरील श्रद्धेचा पुरावा आहे. लेखाचा उद्देश ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्याचा नाही.
>कुराण बायबल सदसद विवेक बुद्धीला स्मरुन देखील शपथ घेता येते.
पण तर्कनिष्ठ न्यायव्यवस्थेमध्ये एका पुस्तकाला स्मरण्याची गरज काय? त्याऐवजी अगाथा ख्रिस्थीच्या पुस्तकाला स्मरून शपथ घेतली तर चालेल का?
>पारंपारिक सोय
श्रद्धेच्या विरोधात असणार्या वैज्ञानिकांनी ही प्रथा बंद करण्याविषयी काही केले असते तर त्यांच्या आर्गुमेंटला आणखी बळकटपणा आला असता असे वाटते. मागे नेचर मासिकाने खास नाताळ सवलत म्हणून काही अंक उपलब्ध केले होते तेव्हा नेचरच्याच एका एडीटरने मेरीच्या कन्सेप्शनविषयी नेचरचे काय मत आहे असा प्रश्न विचारला होता.
>निष्ठा ठेवण्याचे प्रतिक आहे. समूह जीवनात प्रतिकांची गरज भासते. मानवी मेंदुला ही प्रतिमेची गरज लागते.
सहमत. तसेच डॉ अभय बंग यांच्या मते कृष्णाची मूर्ती हे पावित्र्याचे प्रतीक आहे. काही प्रतीके चालतात आणि काही नाही असे का?
>सर्व माणसे समान नसतात. बुद्धीमत्ता कार्यक्षमता उपयुक्तता यात फरक असतो. फरक आहे म्हणुन जग आहे सगळेच चोर असतील तर साव कुणाला म्हणणार? (अथवा उलट)
युटोपियन जगात सर्व माणसे समान असतील कारण सर्व विवेकनिष्ठ पद्धतीने अचरण करतील.
>शपथ म्हणजे वादा! जो वादा किया वो निभाना पडेगा याची किमान जाणीव तरी यातुन होते
सहमत. या व्यवहारात तर्कनिष्ठतेपेक्षा भावना येत आहेत असे वाटून जाते.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
इंद्राय स्वाहा
विवेकवाद्यांना गांधीवाद चालतो असे कोण म्हणाले?
स्मरणार्याच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेणे नैतिक नसले तरी त्यात न्यायालयाची अंधश्रद्ध वागणूक नाही.
तोवर उच्च-नीच वागणूक बरोबर आहे ना?
एरवी
एरवी प्रत्येक मुद्दा विज्ञानाच्या कसोटीवर घासून बघणार्यांना चर्चेतील मुद्यांचे रॅशनलायझेशन करताना पाहून अंमळ करमणूक जाहली. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना
म्हणजे?
आम्ही दिलेली रॅशनलायझेशन्स् तोकडी आहेत असा आपला आरोप आहे काय? तसे असल्यास त्यांतील त्रुटी दाखविण्याची कृपा करावी.
वाचतोय..!
प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. धन्यवाद...!
-दिलीप बिरुटे
[वाचक]
कंपनी, मऊ लागेल तिथे खणणे, इत्यादि.
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*इथे आपणा सर्व उपक्रमींचा एक समुदाय आहे. विषयवार काही उपसमूह आहेत.या व्यतिरिक्त कांही कंपू/कंपन्या आहेत असे लिहिणे म्हणजे"संगणकोsस्तीति टंकितव्यम् ।"त्याला कोणताही आधार नाही.इथले सदस्य अशा संकुचित मनोवृत्तीचे नाहीत असा माझा दृढविश्वास आहे.
* लेख/प्रस्ताव यावर प्रतिसाद देताना त्या लेखात काय आहे याचाच विचार होतो असे आजपर्यंतचे प्रतिसाद वाचून वाटते. काही उपक्रमी प्रस्तावकाचे नाव पाहून प्रतिसाद लिहितील हे कल्पनेत तरी संभवते काय? असा आरोप म्हणजे सदस्यांचा अपमानच होय.
* प्रत्येकाला विद्वत्ताप्रचुर आणि माहितीपरिपूर्ण लेख लिहिणे जमेल असे नाही.जो तो आपल्या क्षमतेला अनुसरून लिहिणार.तो लेख कांही जणांना कंटाळवाणा, सपक वाटणे स्वाभाविक आहे. त्यांनी तसे व्यक्त करणे योग्यच आहे. त्यामुळे प्रस्तावकाला आपला स्तर ,आपले स्थान याचे भान येते. पुढचा लेख टाकताना तो अधिक सजग होतो.
*"नवे लेखन" मधील पहिल्या तीन पानांवरील सर्व लेख पाहिले.विषयांचे वैविध्य खूप आहे.
*सद्ध्या उपक्रमावर येणार्या पाहुण्यांची संख्या मोठी दिसते. त्यांना रंजक वाटेल , आणि उपक्रमाच्या मार्गदर्शक तत्त्वांत बसेल या हेतूने मी तीन लेख लिहिले. केवळ तात्त्विक चर्चेपेक्षा अनुभवकथन, संवादरूप लेखन लक्षवेधून घेते असे वाटते. हेतू साध्य झाला नाही. मर्यादेचे आत्मभान आले.
* "मऊ लागते तेथे खणणे " हे प्रियाली यांचे लेखन दूषित पूर्वग्रह आणि अपुरी माहिती यांवर आधारित आहे. मुसलमान बुवांची, तसेच बायांची सुद्धा, अनेक प्रकरणे अंनिसने उजेडात आणली आहेत.ख्रिश्चन धर्मगुरूंचा फ़ेथ हीलिंग हा फ़सवणुकीचा प्रकार अंनिसने बंद पाडला.सविस्तर माहिती डॉ. नरेन्द्र दाभोळकर लिखित "तिमिरातुनी तेजाकडे"(राजहंस प्रकाशन, पृष्ठे ४७०, मूल्य ४००रु.) या पुस्तकात आहे.
*अंनिसचे कार्य हिंदूंसाठी इष्ट आहे की अनिष्ट? हितकारक की अहितकारक? हिंदूंच्या हिताचे असेल तर "आधी त्यांना सांगा! आधी त्यांना सांगा! मग आम्हाला" असे तर्कविसंगत का बोलले जाते? विचार करता वाटते की अंनिस आणि डॉ.दाभोळकर यांच्याविषयी वाटणारा आकस."आम्ही आमच्या श्रद्धांचे काय ते पाहून घेऊ. हे अंनिसवाले आम्हांला सांगणारे कोण?"असा एकूण पवित्रा दिसतो."अंधश्रद्धा निर्मूलन व्हायला पाहिजे" असे वरवर म्हणायचे.मग "त्यांच्या आधी,त्यांच्या आधी करा.मग आमच्या. तुम्ही मऊ लगेल तिथे खणता" असा ओरडा करणे हा कांगावखोरपणा आहे.
....शांतचित्ताने आणि पूर्वग्रहविरहित दृष्टीने विचार केल्यास हे पटू शकेल.
*
शांतचित्त आणि कांगावेखोरपणा
"मऊ लागले म्हणून" या प्रतिसादातून केलेला कांगावेखोरपणा मला मान्य आहे. त्यानिमित्ताने, आपण बाहेर पडून हा प्रतिसाद लिहिलात हे उत्तम झाले. "अंनिस फक्त हिंदु धर्मावर टिका करते" हे माझे वाक्य नाही ते वाक्य म्हटले जाते/दिसते असे मी लिहिले आहे. त्याचा प्रतिवाद माझ्याकडून होतो असेही लिहिले आहे परंतु मऊ असते तेथे खणले जाते या मुद्द्यावर मी कायम आहे. तीही एक बारकीशी का होईना पण बाजू आहे विसरणे मला योग्य वाटत नाही.
पूर्वग्रहविरहित दृष्टी हे सर्वांचेच असायला हवेत ना. "अवतार आणि पुनर्जन्म" असे शब्द उच्चारता जर फेफरे येत असेल आणि इतरांच्या चर्चांची हानी केली जात असेल तर कोणी कोणाला पूर्वग्रहविरहित दृष्टीचे डोस पाजायचे? जर समोरच्याला तुम्ही उपदेश करता परंतु स्वतःचे आचरण त्या विरुद्ध असेल तर इतरांनी किती दिवस सहन करावे अशी अपेक्षा आहे? आपल्याला मानवत नाही त्या विषयाला निरर्थक वगैरे म्हणणे हे सूज्ञपणाचे लक्षण नाही. त्या चर्चेत सांगूनही कळले नाही, सुधारले नाही आणि हे पुन्हा पुन्हा होईल असे वाटले तेव्हा मीही हा डोस पाजून पाहिला. तो लागू पडला तर उत्तम म्हणेन.
व्यक्तीपेक्षा लेख महत्त्वाचा हे तत्त्व म्हणून उत्तम असले तरी व्यक्तीकडे पाहून प्रतिसाद येणे हे मानवी स्वभावाला धरून आहे तेव्हा ते तसे होते असे मला वाटते. आवडत्या लेखकांचे, आपल्या मित्रमंडळाचे, कंपूतील सदस्याचे लेख प्रथम वाचले जातात आणि त्यांना पूरक प्रतिसाद दिला जातो असेही होते हे नाकारून चालणार नाही.
संवादरूप लेखन लक्ष वेधून घेते हे खरे आहे. आपण लिहिताही रोचक आणि त्यात थोडे बदल करून वेगळ्या धाटणीचे लेखही लिहिता येतील. हा सल्ला आहे सक्ती नव्हे.
शांतचित्त, समजूतदारपणा वगैरेंची जेवढी गरज मला आहे तेवढीच ती आपल्याला, इतरांना तुच्छ लेखणार्या सर्वांना आहे हे समजून घ्यावे. तसे झाले की उपक्रमावर येणारे लेख भरकटवले जाणार नाहीत.
बाकी काय म्हणू? आपण जशी माझ्या चर्चेत ७५+ प्रतिसाद होऊन गेल्यावर क्षमा मागितलीत तशी मीही मागून मोकळी होते. :-)
मूर्तीसमोर रुपया/डॉलर ठेवण्यात आनंद मिळू शकतो हे अविश्वसनीय का?
हे अविश्वसनीय का वाटावे हे कळत नाही. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असतात. एखाद्याला मूर्तीसमोर पैसे ठेवण्यात आनंद मिळू शकतो तर एखाद्याला तो मिळत नाही. 'श्यामची आई' या पुस्तकात समुद्राला अर्पण केलेल्या पैशांबाबत एक सुंदर किस्सा आहे. तुमच्या प्रतिसादांवरुन तुमचे वाचन चांगले असावे व तो किस्सा तुमच्या वाचनात आला असावा असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
इमोशनल अत्याचार
सापडले एकदाचे ते पुस्तक! तो किस्सा नीट आठवत नव्हता. त्या प्रसंगात ते कुटुंब नवसासाठी प्रवास करीत असते. म्हणजे नुसती रूढीग्रस्त कृती नाही तर डायरेक्ट अंधश्रद्धाच! साने गुरुजी विवेकवाद्यांच्या काय कामाचे?
गंमत म्हणजे आता साधना मासिक दाभोळकर चालवितात.
साधना व साने गुरुजी
तो नवस श्यामने केला होता का? त्या नवसाच्या संदर्भात त्याचे वय लक्षात घेता श्यामने कोणत्या स्वरुपाचा निषेध करणे आवश्यक होते? आपल्या मते हा प्रसंग ही फार डेंजरस गोष्ट असावी, मात्र तरीही पूर्ण प्रसंगात श्यामची काय चूक होती हे कळले नाही.
हे वाक्य बोलून आपण विवेकवाद्यांचा अपमान करत आहात. याउलट आपल्यासारखे रॅडिकल रॅशनलिस्ट हेच मध्यममार्गी विवेकवाद्यांचे व विवेकवादाचे नुकसान करत आहेत असे वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
म्हणजे?
मध्यममार्गी विवेकवादी म्हणजे काय? वाईट ते चांगले या पटावर (स्पेक्ट्रम) मध्येच का थांबावे?
नवसही श्यामने केला नव्हता आणि नाणेही त्याने टाकले नाही. त्याने फक्त नाणे टाकण्याच्या कृतीचे कौतुक केले. यावर माझी टिप्पणी अशी की 'नवस बोलल्यामुळे फायदा होतो' असे मानणारी व्यक्ती अंधश्रद्ध असते. त्या व्यक्तीची दुसरी कृती निव्वळ आनंदासाठी होती असे बाय डिफॉल्ट का मानावे? हजारो वर्षे समुद्राला सजीव मानतात. मग 'नाणे टाकणे' ही कृतीसुद्धा अंधश्रद्धाजन्य ठरावी ना?
?
मध्यममार्ग
मध्यममार्गी विवेकवादी म्हणजे काय? वाईट ते चांगले या पटावर (स्पेक्ट्रम) मध्येच का थांबावे?
वाईट ते चांगले या पटावर मध्येच थांबणे म्हणजे मध्यममार्ग नव्हे. ज्या समाजात आपण राहतो त्याची मानसिकता समजावून घेवून त्यानुसार विवेकवादाचे डोस पाजणे म्हणजे मध्यममार्ग अशी माझी व्याख्या आहे. या व्याख्येत विवेकवादी मार्गावर मध्येच थांबणे कोठेही अपेक्षित नाही. मात्र डोस किती जालीम हवा हे ठरवणे अपेक्षित आहे. अन्यथा अशा डोसची रिऍक्शन येऊन (ज्याला आपण रोगी समजत आहोत तो) रोगी अडेलतट्टू बनू शकतो.
श्यामची आई हे पुस्तक माझ्या संग्रहात सध्या नाही. हा प्रसंग मला आठवल्यामुळे मी लिहिला होता. मात्र या प्रसंगासंदर्भात श्यामचा पर्स्पेक्टिव कौतुक करण्याचा नसून केवळ (सदर प्रसंग सांगण्याच्या दृष्टीने) एक स्टेटमेंट करण्याचा होता असे आठवते. नाणे टाकणे ही कृती अंधश्रद्धाजन्य आहे, यात काही वाद नाही. पण हे नाणे टाकल्यामुळे असे काय मोठे नुकसान झाले हे मला समजत नाही. कदाचित समुद्राने आपल्याला एवढे भरभरुन दिले, त्याची परतफेड हे नाणे समुद्रात टाकून आपण करुयात असा संस्कार श्यामवर करणे त्याच्या आईला अपेक्षित असेल. (वैज्ञानिक व व्यावहारिक दृष्टिकोण बाळगणाऱ्या बीपी सारख्या कंपन्या जे प्रदूषण करतात त्यामानाने हे एक नाणे समुद्रात टाकणे फारच क्षुल्लक प्रदूषण आहे असे मी मानतो.) मात्र या प्रसंगातून निसर्गाच्या प्रती आपले काहीएक कर्तव्य आहे हा संस्कार श्यामवर झाला हे महत्त्वाचे.
काही वर्षांपूर्वी मुकुंद टांकसाळे लोकसत्तेत एक दैनिक स्तंभ लिहित असत (गमतीगमतीत की सक्काळी सक्काळी असे काहीतरी नाव असावे.. नक्की आठवत नाही.) त्यात त्यांनी त्यांचा स्वानुभव लिहिला होता. टांकसाळे स्वतः साधना परिवारातील असावेत. (त्यावेळी) ते रॅडिकल रॅशनलिस्ट होते. कोणाच्या घरी सत्यनारायणाची पूजा असली की बोलावणे आले तरी तिथे जायचे नाही. प्रसाद खायचा नाही. जमेल तशी टिंगलटवाळी करायची असा विवेकवादी दृष्टिकोण त्यांनी जपला होता. एकदा त्यांच्या शेजारच्या अपार्टमेंटमध्ये सत्यनारायणाची पूजा होती. शेजारधर्माला अनुसरुन त्यांच्या शेजाऱ्याने पूजेसाठी व प्रसादासाठी बोलावले. थोडासा शेजारधर्म पाळावा म्हणून माफक वेळेसाठी हजेरी लावण्यासाठी टाकसाळे गेले, मात्र त्यांनी अनेकदा आग्रह केल्यानंतरही प्रसाद वगैरे खाल्ला नाही. शेजाऱ्यांना फार वाईट वाटले. काही दिवसांनी टांकसाळे फार आजारी पडले. घरी काळजी घेणारे कोणी नव्हते तेव्हा या शेजाऱ्यांनी त्यांची मुलासारखी काळजी घेतली.
या प्रसंगानंतर टांकसाळ्यांनी विचार केला की त्या पूजेच्या वेळी मी जे काही केले तो विवेकवादी दृष्टिकोण होता की फक्त माझा अहंकार जपणे? जर मी तो पदार्थ प्रसाद समजून खाण्याऐवजी स्वीट डिश म्हणून खाल्ला असता तर शेजाऱ्यांचे मन दुखावणे मला टाळता आले असते. त्यांच्या त्या पदार्थाप्रती काही भावना होत्या, मी त्या समजावून घेऊ शकलो असतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
अंशतः सहमत
मीही असेच विधान केले आहे.
'नाणे टाकणे' या कृतीत स्वतोमूल्य (इंट्रिंन्सिक व्हॅल्यू) आनंद नाही असेच सिद्ध होते.
आनंदाची व्याख्या
मी याआधीही एका प्रतिसादात असे लिहिले होते की कोणत्या कृतीत आनंद मानायचा याचे संपूर्ण स्वातंत्र्य ती कृती करणाऱ्याला असते. केवळ पंचज्ञानेंद्रियांना काहीतरी जाणवले (स्पर्श-चव-दृष्टी-श्रवण-गंध) म्हणजेच आनंदाची अनुभूती यावी ही मला फार basal व्याख्या वाटते.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
तरीही
ती कृती आनंदासाठी होती असे साने गुरुजींचेही मत नव्हते. ती कृती भीतीजन्य होती असे गृहीत धरायला वाव आहे.
माझ्यामते
गुरुजींनी कृतीमागचा कार्यकारणभाव विशद केला नसल्याने,
आपण ती कृती भीतीजन्य होती असे गृहीत धरु शकता. मी ती कृती आईने मुलावर निसर्गप्रेमाचे विशिष्ट संस्कार करण्यासाठी केलेली होती असे गृहीत धरु शकतो.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
असले कसले प्रेम?
प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे
आपल्या दोघांच्या फ्रिक्वेन्सीज् योग्य प्रकारे ट्यून होत नाहीत (किंवा तुमचे आणि आणचे रुलिंग प्लॅनेट्स जुळत नसावेत :-) ) असे दिसत आहे.
त्यामुळे या विषयावरील संवाद इथे थांबवणे इष्ट वाटते.
मात्र तरीही राजाचे नाक कापणारे माकड ही गोष्ट आठवल्याचे वाचून गंमत वाटली. माझ्या मते गुरुजींच्या आईच्या कृतीचे ते परिणाम तेवढे गंभीर नव्हते. या प्रसंगापश्चात नाक कापले जाण्यासारखी काही गैरकृत्ये गुरुजींनी केल्याचेही आढळले नाही. त्याचे श्रेय या संस्कारांना देता यावे.
(त्यांची व माझी-इतरांची राजकीय-किंवा सामाजिक प्रश्नांवरील मते वेगवेगळी असली तरीही). एकंदर माणूस भला होता.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मूळ मुद्दा
साने गुरुजी भले होते यात वादच नाही. पण अंधश्रद्ध लोक भले असू शकतात.
अर्थात मूळ मुद्याशी हे फाटे आहेत. मूळ मुद्दा आहे की नाणे टाकणे ही आनंद मिळविणारी कृती नव्हती, भले अंधश्रद्धेतून असो अथवा निसर्गप्रेमातून.
स्टीवन वाईनबर्ग यांचे एक वचन काहीसे असे आहे: वाईट माणसे वाईट वागतात आणि चांगली माणसे चांगली वागतात. धर्म चांगल्या माणसांकडून दुष्कृत्ये करवून घेतो.
नक्कीच. (अर्थात या अतिशयोक्त रूपकात समुद्राचे नाक कापले जाणे अपेक्षित होते, उदा. नाण्यामुळे प्रदूषण, इ.)
दीवार
जर मी तो पदार्थ प्रसाद समजून खाण्याऐवजी स्वीट डिश म्हणून खाल्ला असता तर शेजाऱ्यांचे मन दुखावणे मला टाळता आले असते. त्यांच्या त्या पदार्थाप्रती काही भावना होत्या, मी त्या समजावून घेऊ शकलो असतो.
इथे दीवारमधील शशी कपूरचा डायलॉक आठवला.
"मां तुम्हे प्रशाद दे रही है, तुम मिठाई समझ के खा लेना."
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com