काल आई आजीला फोनवर काहीतरी सांगत होती. की आता आपलं जातं माळ्यावर धूळ खात पडलंय. मला कळेना की जातं म्हणजे काय? मी आईला विचारलं. "काय गं जातं म्हणजे काय?". आई फार घाईत होती म्हणाली , "सांगेन नंतर कधीतरी, आत्ता मला आधी कुकर लाऊ दे. " मला काही स्वथ बसवेना, मी सरळ दादाच्या खोलीत गेलो. तो नेहेमीप्रमाणे गेम्स खेळत होता. वॉव! लेटेस्ट एन्.एफ्.एस्.!! मी पार विसरूनच् गेलो मला काय विचारयचंय ते. दादा कसला ग्रेट खेळतो! ओम ला मी सांगणार आहे आज की माझ्या दादाने ४ ट्रॅक्स त्याच्या आधी पूर्ण केले. अरे हो! मला एकदम आठवलं जात्याबद्दल. मी दादाला विचारलं की जातं काय असतं. तर म्हणे "ग्राइंडिंग मशिन, पुर्वी दळणाला वापरायचे बहुतेक. बाबांना विचार. आणि मला खेळू दे"
तसा मी हुशार आहे... पण बाबा येइपर्यंत थांबायचं म्हणजे. तसंही बाबा येणार रात्री कधीतरी. तेव्हा मला आई झोपायला लावते. अरे हो.. तर जातं.. जर दादा म्हणतो तसं ग्राइंडिंग मशीन असेल तर आपल्या एवढ्याशा माळ्यावर कसं मावलं? आपल्या पिठाच्या गिरणीत तर केवढं मोठ्ठ मशीन आहे. तसा मी हुशार आहे, लगेच मी खाली नाना आजोबांकडे गेलो. आमच्या खालीच राहतात. त्यांच्याकडे फिशटँक आहे आणि त्यात किलर मासा पण आहे. मी त्याचं नाव डॅनी ठेवलंय. अरे हो.. तर जातं.. मी नाना आजोबांकडे गेलो. गेल्या गेल्या नेहेमीप्रमाणे त्यांनी हातातला पेपर खाली ठेवला. आणि मला गोळी दिली.
"आजोबा, जातं म्हणजे काय हो?" मी पण गोळी तोंडात टाकल्या टाकल्या प्रश्न केला
" का रे बाबा? आज काय हे मधेच? शाळेत विचारलय का? का गृहपाठात आहे?"
"सांगा नाऽऽऽ!!" आमच्या नानांना प्रश्नच फार असं सतीश काका बोलल्याचं मला आठवलं
"बरं बरं. सांगतो. आमच्या घरातच जातं नाही आहे. पण आजच् एका मासिकात एका जात्यावर पिठ काढणार्या बाईचं चित्र आहे."
"वॉव. म्हणजे यात पिठ दळायच्? स्वतः?"
"अरे! पिठ दळता येतं का? धान्य दळायचं. आणि हो स्वतः! आता हे बघ..." त्यांनी एक् चित्र काढलं. "जातं असं दोन सपाट दगडांच्या जड चकत्यांचं बनलं असतं. एक घट्ट बसलेला असतो तर एक त्यावर गोल फिरतो. या इथुन वरून धान्य टाकायच आणि हे जातं गोल गोल फिरवायचं की या दोन दगडांमधे धान्य भरडलं जातं...."
"भरडलं भणजे?"
"म्हणजे स्मॅश होतं. आणि त्याचं पिठ बनतं. हे पिठ इथुन बाहेर येतं"
तसा मी हुशार आहे. लगेच विचारलं "पिठाला कसं काय कळतं कुठुन बाहेर यायचं ते."
"हं" आजोबा हसले. असे ते कधी कधी उगाच हसतात." हे चित्र बघ...."
".... हे 'आय' लिहिलं आहे ना तिथुन धान्य टाकायचं. जात्याला आतमध्ये चिरा असतात आणि चर असतात.. चर म्हणजे "क्रॅकिंग्ज" यामुळे धान्य नीट भरडलं जातं. व्हेरी फाईन. पिठ कीती जाड किंवा बारीक हवं आहे त्यावर हे चर कीती खोल आणि किती हवेत ते ठरतं. चिरा म्हणजे ज्यात धान्य भरडल्यावर पिठ साचतं ते!"
"पण ते बाहेर कसं येतं?"
"जेव्हा नवीन पिठ तयार होतं ते पिठ आधिच्या पिठाला चिरांमधून बाहेर ढकलतं"
इतक्यात आ़जी मस्त भज्या घेऊन आली
"आजी, तु पाहिलं आहेस जातं?"
"पाहिलं?! अरे मी तर स्वतः दळलं आहे जात्यावर. वा वा काय सुरेख पीठ मिळायचं अगदी आपल्याला हवं तसं जाड. त्या भय्याची कटकट नाही. इतरांचं हलकं पीठ मिसळायला नको."
आजी एकदम काहीतरी गाणं गुणगुणायला लागली. मला तर एकही शब्द कळेना.
"हे काय गातेस? काही कळलं नाही!"
"ही अहिरणी बोली आहे. तुला नाही कळायची"
मला नाही काळायची म्हटलं की अस्सा राग येतो मला! जाऊदे! तसंही आजीला काहि नव्हतं त्याचं ती त्या गाण्यतच अडकली होती.
आजोबा सांगत होते. " आपल्या भय्याचं जे मशीन असतं ना तेही असंच काम करतं फक्त एलेक्ट्रीक मोटार जात्याला फिरवते. त्यामुळे खुप पीठ वार जलद बाहेर येतं." मी विचार करत होतो की आपल्या जयकिसनला(आमचा पीठाचा भैय्या) एकदा मशीन उघडलं की मला बोलावं असं सांगायचं. इतक्यात मला आठवले की आपल्याकडे जातं आहे. मी तसा हुशार आहे! मी पक्क ठरवलं की रविवारी बाबांना जातं माळ्यावरून काढायला लावायचं आणि स्वतः पीठ काठून बघायचं. सही! कीती ग्रेट आयडिया आहे. ओमला आत्ता सांगतो या विकेन्डचा प्लॅन.. त्यालाही बोलावतो.... तुम्हीपण बघा कधीतरी जात्यावर दळून!!